ओडिशातून नागपुरात आलेला गांजा जप्त

05 Oct 2025 21:17:08
अनिल कांबळे
नागपूर,
Marijuana seized : ऑपरेशन थंडर सुरु असल्यामुळे एमडी, गांजा तस्करांवर पाेलिसांची धडाक्यात कारवाई सुरु आहे. मात्र, लपून छपून अन्य राज्यातील गांजा तस्कर शहरात तस्करी करीत आहेत. ओडिशा राज्यातून शहरात छुप्या मार्गाने गांजा तस्करीची खेप शहरात पाेहाेचल्यानंतर विक्रेत्यापर्यंत पाेहचण्यापूर्वीच पाेलिसांनी छापा घातला. दाेन विक्रेत्यांना अटक करीत 8 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
 
GANJA
 
 
 
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून, रविवारी संध्याकाळी 6 वाजता पारडी पाेलिस ठाणे हद्दीतील भंडारा-नागपूर हायवे, नाका क्रमांक 5 जवळ, पाल इंडियन ऑईल पेट्राेल पंपाजवळ सापळा रचला. येथे एका अ‍ॅप्पे ऑटाे व बर्गमॅन वाहन येताच पाेलिसांनी ते थांबविले. वाहन चालक माेहम्मद शारीक माेहम्मद वकील अंसारी (30, इंदिरामातानगर, बिनाकी ले-आऊट, यशाेधरानगर) आणि माेहम्मद मासूम शेरअली शेख उमर (22, वनदेवी चाैक, कामगारपुरा, यशाेधरानगर) या दाेघांची झडती घेतली.
 
 
त्यांच्याजवळ 12 किलाे गांजा सापडला. या गांजासह पाेलिसांनी दाेन्ही वाहन, माेबाईल, अ‍ॅल्युमिनिअमच्या प्लेटस, रॅक असा एकूण 8 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पाेलिसांनी ठाण्यात आणून दाेन्ही आराेपींची चाैकशी केली असता त्यांनी हा गांजा त्यांचे ओडिशा राज्यातील साथिदार लावण्य राणा आणि गाेपीनाथ भाेकता यांच्या मदतीने शहरात विक्रीकरिता आणल्याची कबुली दिली. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपींविरूद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. दाेन्ही आराेपींना जप्त मुद्देमालासह पारडी पाेलिसाच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पथकाचे पाेलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांचे मार्गदर्शनानुसार पाेलिस हवालदार पवन गजभिये, गणेश जाेगेकर, नितीन साळुंखे, राहुल पाटील, शैलेष डाेबळे, सहदेव चिखले पथक द्वारे करण्यात आली
Powered By Sangraha 9.0