मुसळधार पावसाने मिस्किन टँक तलाव ओसंडला; परिसर जलमय!

05 Oct 2025 20:54:51
भंडारा,
miskin-tank-lake-overflowed : आज दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या मागे असलेल्या मिस्किन टँक तलाव ओसंडून वाहू लागला. या तलावाच्या सभोवताली बांधलेल्या आवार भिंतीच्या मध्ये तयार करण्यात आलेला अर्ध्या फुटाचा माती आणि मुरमाचा भाग निघाल्याने तलावातील पाणी ओसंडून वाहू लागले. तलावातील पाणी गांधी विद्यालयाच्या पटांगणात साचून परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एवढेच नाही तर जेसीस कॉन्व्हेंट या शाळेच्या मैदानातून पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून दोन ते तीन फुटावरून वाहू लागले आहे.
 
 
BHANDARA
 
 
 
आज सकाळी प्रखर ऊन्ह असताना दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दोन तास अखंड बरसलेल्या या पावसाने मिस्किन टँक तलावाची पाणी पातळी वाढली. सध्या तलावाचे खोलीकरण आणि सौंदर्याकरणाची कामे सुरू आहे. तलावाच्या सभोवताली सुरक्षा भिंत बांधली गेली असून त्यात अर्धा फुटाचा एक भाग माती आणि मुरूम टाकून आवार भिंतीच्या मध्ये बांधण्यात आला. मुसळधार पाऊस झाल्यानंतर हा माती आणि मुरमाचा भाग खचला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत निघाला. या भागातून तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणात उसंडून वाहू लागले. पाणी जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने गांधी विद्यालयाच्या प्रांगणात पाणी सचून संपूर्ण परिसर जलमय झाला तसेच सध्या तहसील कार्यालय असलेल्या जेसीस कॉन्व्हेंट शाळेच्या प्रांगणातून पाणी वाहत रस्त्यावर आले आणि दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावरून वाहू लागले.
 
 
पाऊस थांबल्यानंतरही मैदानात सुमारे तीन फुटापर्यंत पाणी साचलेले असल्याची माहिती आहे. सुदैवाने आज शाळेला सुट्टी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. असे असले तरी उद्या सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या जलमय परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. या घटनेमुळे नगरपरिषदेच्या व्यवस्थापनाबाबत आणि पाणी निचरा होण्यासाठी नगरपरिषद ची अकार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भविष्यात तलावाची पाय फुटून एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरपालिकांच्या प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 
मीस्किन टॅंक तलावाच्या सभोवती आवार भिंत बांधण्याचे करण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी या आभार भिंतीच्या मध्ये आठ ते दहा फुटाच्या एका पॅचमध्ये मुरूम माती आणि गिट्टी भरून तो पॅच बंद करण्यात आला. आज झालेल्या मुसळधार पावसाने हा मातीचा पॅच निघाल्यामुळे तलावातील पाणी वाहू लागले. सध्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून गिट्टी आणि मुरूम टाकून पाण्याचा प्रवाह कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
करण कुमार चव्हाण, मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा.
Powered By Sangraha 9.0