‘पिच टू गेट रिच’ लवकरच जिओ हॉटस्टारवर

05 Oct 2025 12:45:08
मुंबई
Pitch To Get Rich बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि शो होस्ट करण जोहर पुन्हा एकदा नव्या रिअॅलिटी शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कॉफी विथ करण’सारख्या लोकप्रिय टॉक शो नंतर, करण जोहर आता ‘पिच टू गेट रिच’ या फॅशन आणि स्टार्टअप्सवर आधारित रिअॅलिटी शोसह धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. हा शो येत्या २० ऑक्टोबरपासून जिओ हॉटस्टारवर प्रीमियर होणार असून, शुक्रवारी याचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
 
 

Pitch To Get Rich 
या नव्या शोमध्ये फॅशन उद्योगाशी संबंधित स्टार्टअप्स आणि उद्योजक केंद्रस्थानी असणार आहेत. शोमध्ये १४ उद्योजक त्यांच्या कल्पक व्यवसाय कल्पना आणि उत्पादनांसह, गुंतवणूक मिळवण्यासाठी देशातील प्रतिष्ठित गुंतवणूकदारांसमोर आपले 'पिच' सादर करणार आहेत. हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून, यातून उद्योजकांना व्यावसायिक मार्गदर्शन, मेंटरशिप आणि गुंतवणूक मिळणार आहे. शोमध्ये ४० कोटी रुपयांचा गुंतवणूक पूल ठेवण्यात आला आहे, जो भारतातील नव्या पिढीतील फॅशन उद्योजकांना चालना देण्यासाठी वापरला जाणार आहे.
 
 
‘पिच टू गेट रिच’मध्ये करण जोहर यांच्यासोबतच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अभिनेत्री मलायका अरोरा जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत उद्योगजगतातील दिग्गज व्यक्तिमत्वे — नवीन जिंदल, ध्रुव शर्मा, रवि जयपूरिया, दर्पण सांघवी, गौरव डालमिया, वागीश पाठक आणि विनोद दुगर हे देखील शोमध्ये जजच्या भूमिकेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या मंचावर अभिनेता अक्षय कुमार देखील सहभागी होणार असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट झाले आहे.या मालिकेबाबत बोलताना धर्माटिक एंटरटेनमेंटचे सीईओ अपूर्व मेहता म्हणाले, “धर्माटिकमध्ये आम्ही सदैव प्रभावी कथा सांगण्यावर विश्वास ठेवतो. ‘पिच टू गेट रिच’ ही केवळ एक मालिका नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे. हे शो भारतीय रचनात्मकता, व्यवसायिक दृष्टिकोन आणि नवोन्मेष यांचं अनोखं मिश्रण सादर करतो.”
 
 
फॅशन एंटरप्रेन्योर फंडचे संस्थापक संजय निगम यांनी या शोविषयी बोलताना सांगितले, “‘पिच टू गेट रिच’ ही मालिका केवळ फंडिंगबद्दल नाही, तर ‘मेक इन इंडिया’ला चालना देणारा एक व्यासपीठ आहे. यातून भारतीय फॅशन उद्योगातील नवोदितांना संधी मिळेल आणि ही मालिका प्रेक्षकांसाठीही मनोरंजनाने परिपूर्ण असेल.”
‘पिच टू गेट रिच’ ही मालिका धर्माटिक एंटरटेनमेंट आणि फॅशन एंटरप्रेन्योर फंड यांच्यातील संयुक्त उपक्रमातून तयार झाली आहे. भारतातील स्टार्टअप संस्कृतीला आणि फॅशन क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देणारा हा शो मनोरंजनाबरोबरच प्रेरणादायी ठरणार आहे, याबाबत शंका नाही.
Powered By Sangraha 9.0