"रणबीरला ब्रेक, आमिरला हिरानीची साथ'

05 Oct 2025 12:33:14
मुंबई
ranbir kapoor बॉलीवूडमधील 'खान युग' संपत आल्याची चर्चा सुरू असताना, रणबीर कपूरने मात्र आपल्या दमदार भूमिकांमुळे नवा शिखर गाठला आहे. 'अ‍ॅनिमल'सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर रणबीर आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असून, सध्या तो संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये व्यग्र आहे. यात रणबीरसोबत विकी कौशल आणि आलिया भट्टदेखील झळकणार आहेत.
 
 

ranbir kapoor 
दरम्यान, एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रणबीर कपूर आणि 'संजू' फेम दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटाचे काम काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. ही एक बायोपिक फिल्म असणार होती, जी एका प्रसिद्ध खेळाडूच्या आयुष्यावर आधारित आहे. मात्र रणबीर कपूरच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही फिल्म आता थेट २०२७ साली होणार असल्याचे कळते.
रणबीर आणि हिरानी या दोघांनीही या प्रोजेक्टवर गेल्या वर्षभरात खूप मेहनत घेतली होती. 'संजू'नंतर ही जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र ‘संजू’ने जी उंची गाठली होती, त्या प्रतिमेला पुरून उरण्यासाठी हिरानी हे काहीही गडबडीत करायला इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांनी हा प्रोजेक्ट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान, हिरानी यांनी मात्र नवा मार्ग स्वीकारला आहे. ते आता पुन्हा एकदा आमिर खानसोबत काम करणार आहेत. 'पीके' आणि '३ इडियट्स'नंतर ही हीट जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. 'दादासाहेब फाळके' यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी हिरानी आणि आमिर एकत्र काम करत आहेत. डिसेंबरमध्ये या चित्रपटासाठी वर्कशॉप होणार असून, जानेवारी २०२६ पासून शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे.
 
 
 
आमिर खानने यंदा 'सितारे जमीन पर'सह मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा स्क्रिप्ट्स वाचायला सुरुवात केली आहे. याच दरम्यान हिरानीसोबतची चर्चा फायनल झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.रणबीर कपूरचे चाहते जरी हिरानीसोबतच्या त्यांच्या आगामी चित्रपटासाठी आणखी काही काळ थांबावे लागणार असले तरी, 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर'सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समुळे तो सध्या चर्चेत आहे. दुसरीकडे, आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांची जोडी पुन्हा एकदा इतिहास रचेल, अशीच अपेक्षा सिनेसृष्टीतून व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0