अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी

05 Oct 2025 19:15:16
समुद्रपूर,
farmer crisis, दिवसरात्र शेतामध्ये राबराब राबून तळहाताच्या फोडाप्रमाणे, पोटच्या लेकरासारखे जपलेले जवळचा पैसा, कर्ज काढून जमा केलेला पैसा काळ्या मातीत रुजविला. मात्र, आता हेच पीक अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात सापडल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
 

Samudrapur farmer crisis, soybean crop failure, 
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ हे अस्मानी संकट, पीक चांगले आले तर कवडमोल भाव या सुलतांनी संकटाने बळीराजा पुर्णत: हवालदिल झाला आहे. यंदा तरी चांगले उत्पन्न येईल, अशी आशा बाळगून शेतात राबणारा शेतकरी अतिपावसाने चांगलाच हतबल झाला आहे. ज्या पावसाने त्याच्या मनात हिरवे स्वप्न निर्माण केले त्याच पावसाने मात्र आता डोळ्यांत अश्रु आणले आहे. त्यामुळे आता जगायचे कसे, हा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे. दिवाळी हा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. सणासुदीच्या काळातच सोयाबीन, कापूस या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. खरीप हंगामातील नुकसानीमुळे हातात काहीच लागणार नसल्याने रबीची लागवड कशी करायची, या विचाराने शेतकर्‍यांची झोपच उडाली. शेतातील पाणी आणि ओलावा कायम असल्याने सोयाबीन भरणार नसून सडण्याच्या स्थितीत आहे. नगदी पीक हातातून गेल्याने आता पुढे काय करायचे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. शासनाने या विदारक परिस्थितीचे वास्तव लक्षात घेऊन शेतकर्‍यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
सोयाबीन, तूर आणि कापूस हे तीनही पिके संकटात सापडली आहे. सततच्या पावसाने विहिरी तुडुंब भरून गेल्या आहेत. पावसाळ्यातच पाणी उपसा करावा लागत आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला असल्याने, तसेच पावसाच्या सरी अनपेक्षितपणे कोसळत असल्याने शेत शिवारात चिखल झाला आहे. एवढेच नव्हे तर अनेक शेतात गवत आणि गाजर गवत वाढल्याने पिके दिसेनासे झाले आहे. पिकांमधील आंतरमशागतीचे कामे सुद्धा थांबले आहे. बळीराजा अस्मानी व सुलतानी संकटाने असुरक्षिततेच्या भयाखाली जगत आहेत. थोड्याफार शेतकर्‍यांनी पिकांचा विमा उतरवला. त्यांचा नुकसानीची विमा कंपन्यांकडून अद्याप पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे सरकार केव्हा मदत करणार? सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. याची आठवण शेतकरी सातत्याने करून दिली. पण त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचत नसून त्यांची दखलही घेत नसल्याची स्थिती आहे. या भयानक परिस्थितीतून मायबाप सरकारने वाचवावे, अशी अपेक्षा बळीराजा बाळगून आहे.
Powered By Sangraha 9.0