लालूप्रसादांच्या कुटुंबात पडली फूट

05 Oct 2025 05:30:00
दिल्ली वार्तापत्र
lalu prasads family बिहारमध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली असेल. बिहारची यावेळी निवडणूक भाजपाच्या नेतृत्वातील रालोआ आणि इंडिया आघाडीत होणार आहे. बिहारमध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व मात्र काँग्रेसकडे नाही तर राजदकडे आहे. मात्र यावेळी राजदमध्ये सर्व काही सुरळीत नाही, यावेळच्या निवडणुकीतून राजदला मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र यावेळी राजदमध्ये अंतर्गत म्हणण्यापेक्षा कौटुंबिक संघर्ष उफाळून आला आहे. लालूप्रसाद यादवांच्या कुटुंबातच यादवी निर्माण झाली आहे. लालूप्रसादांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव आणि कन्या रोहिणी आचार्य हे एकीकडे तर तेजस्वी यादव आणि अन्य परिवार दुसरीकडे असा हा संघर्ष आहे. रोहिणी आचार्य या पक्षात आणि कुटुंबात राहून हा संघर्ष करत आहे, तर तेजप्रताप यादव यांची कधीच पक्षातून आणि कुटुंबातूनही हकालपट्टी झाली आहे. तेजप्रताप यांनी जनशक्ती जनता दल या आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. त्यांना ब्लॅकबोर्ड हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. विशेष म्हणजे आपल्या नव्या पक्षाच्या पोस्टरवर त्यांनी लालूप्रसादांचे छायाचित्र वापरले नाही.
 

tejaswi yadav 
 
 
निवडणुकीच्या आधी उगारलेली बंडखोरीची तलवार सध्या रोहिणी आचार्य यांनी म्यान केली असली तरी त्या किती दिवस शांत राहतील, हा प्रश्नच आहे. लालूप्रसादांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाणारे तेजस्वी यादव यांच्या गळ्यात यावेळी मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, असा यादव कुटुंबाचा विश्वास आहे. त्यामुळे या कौटुंबिक संघर्षावर तोडगा काढण्याचे, तो ऐन निवडणुकीच्या वेळेला हाताबाहेर जाणार नाही, यासाठी ऑपरेशन डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. त्याला तात्पुरते यश आलेलेही दिसत आहे.
शिवसेना अखंड असताना त्यात फूट पडण्यासाठी अन्य कारणांसोबत राज्यसभा सदस्य असलेला एक संजय कारणीभूत होता, असे म्हणतात. त्याचप्रमाणे राजदमधील या संघर्षासाठीही राज्यसभा सदस्य असलेला दुसरा संजय कारणीभूत म्हणावा लागेल. या संघर्षाची सुरुवात झाली ते तेजस्वी यादव यांच्या बिहार अधिकार यात्रेतून. तेजस्वी यादव यांच्या बिहार अधिकार यात्रेच्या बसमध्ये तेजस्वी यादव यांच्यासोबत त्यांचे राजकीय सल्लागार संजय यादव बसलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि तेथून राजदमधील अंतर्गत संघर्षाला तोंड फुटले. संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे अतिशय विश्वासू आहेत. तेजस्वीसाठी ते ‘फ्रेंडस, फिलॉसॉफर आणि गाईड’ म्हणायला हरकत नाही. संजय यादव यांच्या सल्ल्यानेच तेजस्वी यादव वागत असतात.
राजदमधील एका कार्यकर्त्यांने आधी याबाबत एक पोस्ट केली. ती पोस्ट लालूप्रसादांना आपली किडनी देणारी त्यांची सिंगापूरनिवासी कन्या रोहिणी आचार्य यांनी रिपोस्ट केली. संजय यादव यांच्याबद्दलची आपली नाराजी रोहिणी यांनी यातून व्यक्त केली. एवढेच नाही तर यादव कुटुंबाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून स्वत:ला अनफॉलो केले. तेजप्रताप यादवही संधीचा फायदा घेत आपल्या बहिणीच्या मदतीला धावले आणि त्यांनी संजय यादव यांचा जयचंद असा उल्लेख केला, यामुळे लालूप्रसादांच्या कुटुंबात आणि राजदमध्येही हल्लकल्लोळ उडाला. नंतर डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून दोन दलित नेत्यांना या बसमध्ये तेजस्वी यादवच्या बाजूला बसवून त्याची छायाचित्रे प्रसिद्धीला देण्यात आली. राजदमध्ये तसेच यादव कुटुंबातही संजय यादव यांच्याबद्दल नाराजी आहे. संजय यादव आपल्याला आपल्या भावाशी, तेजस्वी यादव यांच्याशी, भेटू देत नाही, असा आरोप करत तेजप्रताप यांनी पक्षातून हकालपट्टी होण्यापूर्वी करून खळबळ उडवली होती.
विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर पक्षात उठलेले वादळ शमवण्यात लालूप्रसाद यांना तात्पुरते यश मिळाले, असे म्हणायला हरकत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका भाषणात लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका केल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी आपली बंडखोरीची तलवार म्यान केली. ‘चाहे लाख गाली दो, ताली तो तेजस्वी के लियेही बजेंगी’ असे विधान करत त्यांनी तेजस्वी यादवला पाठिंबा दिला. त्याआधी तेजस्वी यादव यांनीही आपल्या या लाडक्या मोठ्या बहिणीने आपल्याला कसे अंगाखांद्यावर खेळवले, याबाबत एक भावनिक पोस्ट केली होती.
आपल्याला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, आपल्याला विधानसभा निवडणूक लढवायची नाही आणि आपल्या समर्थकांसाठी तिकिटेही मागायची नाहीत, असे सारवासारवीचे विधानही रोहिणी आचार्य यांनी केले. मात्र रोहिणी आचार्य यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा लपलेल्या नाहीत. 2024 ची लोकसभा निवडणूक रोहिणी यांनी बिहारच्या सारण मतदारसंघातून लढवली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यात कुठेही प्रचाराला न गेलेले लालूप्रसाद यादव यांनी सारणमध्ये रोहिणी यांचा प्रचार केला होता. मात्र भाजपाचे राजीवप्रताप रुडी यांनी अतिशय चुरशीच्या या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव केला. रोहिणी यांच्यावर त्या बाहेरच्या असल्याचा आरोप झाला. सारण ही माझ्या वडिलांची राजकीय कर्मभूमी राहिली आहे. आता ती माझी कर्मभूमी होणार आहे, असे रोहिणी यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी म्हटले होते.lalu prasads family मी आता नेहमीसाठी सारणच्या जनतेची सेवा करणार असे म्हणणाèया रोहिणी यांनी निवडणुकीतील पराभवानंतर सिंगापूरला जे प्रयाण केले, त्यानंतर त्या सारणच्या जनतेला कधी दिसल्याच नाहीत.
भाजपाची साथ सोडत, नितीशकुमार यांनी राजदशी आघाडी करत राज्यात जदयु आणि राजद सरकार स्थापन केले होते. या सरकारचा मधुचंद्राचा काळ संपल्यानंतर जेव्हा मतभेद उफाळून आले, तेव्हा रोहिणी आचार्य यांनी एकामागे एक केलेल्या तीन पोस्टमुळे नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत पुन्हा भाजपला कवटाळले होते. ‘अक्सर कुछ लोग नहीं देख पाते अपनी कमियां, लेकिन किसी दूसरे पे किचड उछालने की करते रहते बदतमिजिया’, ही त्यांची पहिली पोस्ट होती. ‘समाजवादी पुरोधा होने का करता वही दावा, हवाओं की तरही जिसकी बदलती विचारधारा’, ही त्यांची दुसरी पोस्ट होती. ‘खीज जताये क्या होंगा, जब हुुआ न कोई अपना योग्य, विधि का विधान कौन टाले, जब खुद की नियत में ही हो खोट’, अशी त्यांची तिसरी पोस्ट होती. या तिन्ही पोस्ट तेव्हाचे राजदसमर्थित मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्ला चढवणाèया होत्या. राजकीय वादळ उठल्यानंतर रोहिणी आचार्य याी तिन्ही पोस्ट मागे घेतल्या, पण त्यांच्या पोस्टमुळे दुखावलेल्या नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत राजदला त्यांची जागा दाखवली.
तर अशा या रोहिणी आचार्य यांच्या कथित बंडामुळे यावेळी राजदला भाजपा आणि जदयुसोबत आपल्या पक्षांतर्गंतच नाही तर कुटुंबातील विरोधकासोबतही लढायचे आहे. लालूप्रसाद यादवांच्या कुटुंबात सगळ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक राजद आणि विशेषत: तेजस्वी यादव यांच्यासाठी सोपी नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी अनेकांच्या कुटुंबात फूट पाडणाèया लालूप्रसादांच्या कुटुंबातच आता राजकीय फूट पडली आहे. याची किंमत त्यांना नक्कीच चुकवावी लागेल. निवडणुकीनंतर एखादवेळी राजदची सत्ता आली तर (ज्याची शक्यता दूरदूरपर्यंत नाही) ही फूट टळू शकते, पण राजद सत्तेवर आला नाही तर राजदचे दोन तुकडे होतील यात शंका नाही
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
Powered By Sangraha 9.0