कॅनडा
Lawrence Bishnoi gang कॅनडामध्ये पुन्हा एकदा भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा थरकाप पाहायला मिळाला आहे. बिश्नोई टोळीशी संबंधित फतेह पुर्तगाल या गुंडाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून देशांतर्गत अनेक ठिकाणी झालेल्या फायरिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये नवी तेसी नावाच्या व्यक्तीवर गंभीर आरोप करत त्याच्या मालकीच्या स्थळांवर तीन दिवसांपासून गोळीबार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फतेह पुर्तगाल या टोळी सदस्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नवी तेसीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावावर ५ मिलियन डॉलर जबरदस्तीने वसूल केले आहेत. त्यामुळेच त्याच्या ठिकाणांवर आम्ही कारवाई केली आहे.” या पोस्टमध्ये कॅनडातील काही पत्तेही दिले गेले आहेत जसे की थेशी एंटरप्राइज (1254, 110 अव्हेन्यू), (घर क्रमांक 2817, 144 स्ट्रीट), आणि (13049, 76 अव्हेन्यू, युनिट नं. 104, स्विफ्ट 1200 एएम). फतेहने स्पष्ट केले की ही सर्व स्थळे नवी तेसीच्या मालकीची आहेत आणि तिथेच फायरिंग घडवून आणण्यात आले आहे.
पुढे फतेहने Lawrence Bishnoi gang लिहिले, “नवी तेसीने गायकांकडून आमच्या टोळीच्या नावाने पैसे वसूल केले आहेत. आम्हाला मेहनती लोकांशी कोणतीही दुश्मनी नाही. जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करून आपली उपजीविका चालवतात आणि आमच्या तरुणांचा सन्मान करतात, त्यांच्याशी आमचा कोणताही वाद नाही. पण जर चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या, तर यामुळे व्यापाऱ्यांच्या जीवित वा मालमत्तेला झालेल्या हानीची जबाबदारी आमची नसेल, तर ती तुमची असेल,” असेही धमकीच्या स्वरात नमूद करण्यात आले.या प्रकारामुळे स्थानिक पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, संबंधित ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कॅनडातील पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात भारतीय दहशतवादाशी संबंध तपासण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, कॅनडा सरकारने अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईला अधिकृतपणे ‘आतंकवादी’ म्हणून घोषित केले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा गँग भारतातून कार्यरत असून त्याचा प्रमुख नेता म्हणजेच लॉरेन्स बिश्नोई सध्याही गुजरातमधील साबरमती जेलमधून मोबाईलद्वारे आपली टोळी चालवत आहे. भारतातच या टोळीचे सुमारे 700 सदस्य सक्रिय असून, डकैती, खंडणी, आणि मनी लॉन्ड्रिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ते सहभागी आहेत.लॉरेन्स बिश्नोई, ज्याचे खरे नाव बलकरण बराड आहे, त्याचा जन्म १२ फेब्रुवारी १९९३ रोजी पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील दुत्रावली या गावात झाला. विद्यार्थी दशेतच त्याने गुन्हेगारी जगतामध्ये पाऊल टाकले. कालांतराने त्याचे नाव बिश्नोई टोळीशी जोडले गेले आणि त्याने गुन्हेगारी क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण केला.बिश्नोईवर आतापर्यंत सिद्धू मूसेवाला खून प्रकरण, राजकारणी बाबा सिद्दीकी यांची हत्या, सुखदेव सिंह गुग्गामेरी हत्या आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सध्या तो साबरमती कारागृहात बंद असला तरी त्याचा प्रभाव भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही जाणवू लागला आहे, याचे हे अलीकडील उदाहरण ठरते.
कॅनडामधील या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही नवा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय गँगस्टर टोळ्यांचा परदेशात वाढता हस्तक्षेप आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणाची चौकशी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून एकत्रितपणे होण्याची शक्यता आहे.