गोंदिया,
water crisis Amgaon आमगाव, सालेकसा तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणार्या बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक समस्या उद्भवल्याने योजनेतून 5 ऑक्टोबरपासून पाणी पुरवठा बंद झाल्याने योजनेच्या लाभ क्षेत्रातील 48 गावांमध्ये ‘जलसंकट’ निर्माण झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.

कधी थकीत पाणी देयक, कधी वीज पुरवठा खंडीत होणे तर कधी योजनेतील बिघाड आदि विविध कारणाने बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजना प्रकाश झोतात राहते. या योजनेचे संचालन येथील जिल्हा परिषेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आहे. योजनेअंतर्गत आमगाव नगर परिषद कार्यक्षेत्रासह आमगाव व सालेकसा तालुक्यातील 48 गावांत पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो. योजनेच्या लाभक्षेत्रात 5 हजार पेक्षा अधिक नळ जोडणी तथा 50 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेद्वारे कधीही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप नेहमी लाभार्थ्यांकडून होतो. विविध कारणाने ही योजना चर्चेत राहते. बनगाव पाणी पुरवठा योजनेचे ग्रामपंखयतीकडे तब्बल 1 कोटीपेक्षा अधिकचे पाणी देयके थकीत असल्याची माहिती आहे. पंपगृह व पॅनलच्या दुरूस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याचे योजनेच्या सुत्रांचे म्हणने आहे. असे असले तरी पाणी पुरवठा बंद करण्याची सूचना देण्यात आली नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणने आहे. दुरूस्ती काम दोनतीन दिवस चालणार असल्याने नागरिकांना दुषित पाण्यावर तहाण भागवावी लागणार आहे.
बनगाव पाणी पुरवठा योजनेच्या पंपगृह व पॅनलच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने येत्या दोनतीन दिवस योजनेद्वारे पाणी पुरवठा बंद राहणार आहे, दुरूस्ती झाल्यावर पुरवठा सुरळीत होईल.
- राजेंद्र सतदेवे उपविभागीय अभियंता, जिप ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गोंदिया.