अग्रलेख
cough medicine लहान मुलांना सर्दी-खोकला होणे ही काही फार गंभीर बाब नाही. बदलत्या वातावरणात असे होतच असते. तसे मोठ्यांनाही होऊ शकते. त्यासाठी बाजारात कित्येक औषधे उपलब्ध असतात. तरीही बालकांना औषध देताना अतिशय काळजी घ्यावी लागते. एका कंपनीने उत्पादन केलेल्या खोकल्याच्या औषधाने 14 मुलांचा बळी घेतला. हा प्रकार समाजमन सुन्न करणारा आहे. ज्या लोकांनी आपल्या पोटचा गोळा गमावला, त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या भावविश्वाबद्दल कोणतीही संवेदनशील व्यक्ती विचारही करू शकत नाही. कोणतीही चूक नसताना त्यांना मुलांच्या वियोगाचे दुःख भोगावे लागत आहे. खोकल्याच्या औषधाचे नमुने घेतले असता, त्यात मानवी शरीरासाठी मोठ्या प्रमाणात विष ठरणारे घटक सापडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, हा प्रारंभिक निष्कर्ष आहे. या प्रकरणात औषध दर्जाहीन होते की डॉक्टरांनी लिहिलेले न घेता भलतेच औषध घेतले गेले, या मुद्यावरही तपास होणे गरजेचे आहे. औषधात विषारी किंवा निकृष्ट-घातक घटक असतील, तर त्यामागे निश्चितपणे मानवी लोभ कारणीभूत आहे. पैशांच्या हव्यासापोटी कुणाच्या जिवाशी खेळण्याची ही प्रवृत्ती अत्यंत कठोरपणे ठेचून काढण्याची गरज आहे.
एका अंदाजाप्रमाणे 2023-24 मध्ये भारतीय औषध उद्योगाचे बाजार मूल्य जवळपास 50 अब्ज डॉलर्सचे होते. 2030 पर्यंत ही बाजारपेठ 130 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या बाजारपेठेत उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते आणि अलीकडेच व्यवसायात आलेल्या ऑनलाईन विक्रेत्यांचा समावेश असलेली श्रृंखला उलाढालीत प्रामुख्याने सहभागी असते. यात ढोबळमानाने उत्पादकांच्या नफ्याचे प्रमाण 20 ते 40 टक्के, वितरकांचे 5 ते 15 टक्के, किरकोळ विक्रेत्यांचे 10 ते 25 आणि ऑनलाईन विक्रेत्यांच्या नफ्याचे प्रमाण 5 ते 15 टक्के असते. मुळात कोणताही उद्योग किंवा व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठीच केला जातो. ते या क्षेत्रालाही लागू आहे. परंतु, औषध क्षेत्र हे मानवाच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने ते सर्वाधिक जबाबदारीचे क्षेत्र आहे. यात फार नफा वाढवण्याचा विचार केला जातो, त्यावेळी औषधांच्या किमती वाढतात. अनेक औषधे बाजारात येतात आणि या औषधांच्या प्रभावाबाबत चुकीचे दावेही केले जातात. बनावट किंवा अपूर्ण तपासणी केलेली औषधे बाजारात येणे, चुकीची माहिती देणाऱ्यां जाहिराती करणे, औषधांचे साईड इफेक्ट लपवणे ही सर्व नफ्याच्या अतीव लालसेतून केली जाणारी कृत्ये. अशा प्रकारांमुळे हे क्षेत्र आरोग्यसेवेऐवजी व्यावसायिक नफ्याचे साधन बनते. लोभ ही मानवी मनाची अत्यंत जुनी आणि खोलवर रुजलेली प्रवृत्ती आहे. मनुष्याला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी हव्या असतात. या गरजा मर्यादेपलीकडे जाऊन अधिकाधिक मिळवण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हा ती लोभात परिवर्तित होते. लोभी मनुष्य कधीही समाधानी राहत नाही. त्याला सतत अधिक पैसा, सत्ता, कीर्ती किंवा संपत्ती हवी असते. लोभ माणसाच्या विचारांवर आणि कृतींवर वाईट परिणाम करणारा असतो. लोभी व्यक्ती इतरांच्या हक्कांवर डाका घालते, फसवणूक करते किंवा अन्यायाचे मार्ग अवलंबते. समाजात अन्याय, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि असमानता या गोष्टींची मुळे लोभातच दडलेली आहेत.
लोभामुळे माणूस आपली मूल्ये, नाती आणि नैतिकता विसरतो. नेमका हा प्रकार औषधांच्या या प्रकरणात झाल्याचे दिसत आहे. मानवी लोभापायी अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. धर्मग्रंथ आणि तत्त्वज्ञान आपल्याला संयम आणि समाधान यांचे महत्त्व शिकवतात. ज्या क्षणी मनुष्य पुरेसे मिळाले असे मानतो, त्या क्षणी त्याला खरी शांती आणि आनंद मिळतो. लोभावर नियंत्रण ठेवणे हेच जीवनातील खरे शहाणपण आहे. थोडक्यात सांगायचे तर, लोभ हा प्रगतीचा अडथळा आणि विनाशाचा मार्ग आहे. समाधान आणि प्रामाणिकपणा या दोन गुणांनीच माणूस खऱ्यां अर्थाने समृद्ध आणि सुखी होऊ शकतो. इतरांनाही सुखी ठेवू शकतो. असा विचार करणारे ज्या समाजात अल्प असतील, तर त्या समाजाची निश्चितपणे अधोगती होते. वैद्यकीय क्षेत्र, औषध व्यवसाय हे मानवी जीव वाचवणारे समजले जातात. पण, नफ्याच्या हव्यासापोटी कुणाच्याही आयुष्याची धूळधाण करायलाही काही जण मागे-पुढे पाहत नाहीत. बालकांचे बळी घेणाऱ्या औषधात नॉन फार्माकोपिया ग्रेड प्रोपिलीन ग्लायकॉल वापरण्यात आल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञ म्हणतात की, प्रोपिलीन ग्लायकॉल हे एक द्रव रसायन आहे. त्याचा वापर औषधांमध्ये, सौंदर्यप्रसाधनांमध्ये आणि खाद्य पदार्थांत द्रावक (सॉल्व्हंट) म्हणून किंवा ओलसरपणा टिकवणारा घटक म्हणून केला जातो. परंतु, नॉन फार्माकोपिया ग्रेड म्हणजे दर्जाहीन किंवा औषध निर्मितीसाठी प्रमाणित न केलेल्या प्रॉपिलीन ग्लायकॉलचा वापर झाल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा दर्जाहीन घटकांचा वापर झाल्यास मुलांमध्ये थकवा, झोप येणे, चक्कर येणे किंवा गोंधळल्यासारखे वाटणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. या रसायनाचे प्रमाण शरीरात जास्त झाल्यास त्यामुळे मूत्रपिंड आणि यकृतावर ताण वाढतो. मुलांच्या त्वचेवर खाज, लालसरपणा पुरळ किंवा जळजळ होऊ शकते. इतकेच नव्हे तर काही वेळा श्वास घेण्यास त्रास, हृदयगती वाढणे किंवा रक्तातील आम्लता वाढण्यासारखे गंभीर परिणाम यामुळे दिसून येतात. या औषधात फार्माग्रेड प्रोपिलीन ग्लायकॉल वापरले नसेल तर, तो एक गंभीर प्रकार आहे आणि तो चुकीने झाला असावा असे अजिबात वाटत नाही.cough medicine दर्जाहीन औषधे धोकादायक असतात. त्यापेक्षा कितीतरी पटीने बनावट औषधांचा धोका मोठा असतो. भारतामध्ये बनावट औषधांचा प्रश्न गंभीर आणि चिंताजनक बनला आहे. औषधांच्या मोठ्या मागणीमुळे काही गैरप्रकार करणारे लोक स्वस्तात बनावट औषधे तयार करून विक्री करतात. या औषधांमध्ये मूळ घटकाचे प्रमाण चुकीचे किंवा कमी असते किंवा ते पूर्णपणे नकली असतात. या बनावट औषधांमुळे रुग्णाच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. भारतातील सुमारे 10 ते 15 टक्के औषधे बनावट किंवा निकृष्ट दर्जाची असतात, असा अंदाज आहे. ही औषधे मुख्यतः ग्रामीण भागात, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा अनधिकृत औषध विक्रेत्यांकडून विकली जातात. या बनावट औषधांमुळे उपचार निष्फळ ठरतात, आजार वाढतात आणि कधी-कधी मृत्यूही होतो. सरकारने या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘ड्रग्ज अॅण्ड कॉस्मेटिक्स अॅक्ट’अंतर्गत कठोर कायदे केले आहेत. इतर कायदे साथीला आहेत. औषधांच्या पॅकिंगवर क्यूआर कोड लावणे, डिजिटल ट्रॅकिंग सिस्टिम लागू करणे आणि जनतेला जागरूक करणे यासारख्या उपायोजना सुरू आहेत. परंतु, अंमलबजावणीत निरीक्षणाचा अभाव, लाचलुचपत आणि ग्रामीण भागांत माहितीचा अभाव यासारख्या अडचणी आहेतच. बनावट औषधांविरुद्ध लढा देण्यासाठी सरकार, औषध कंपन्या आणि नागरिक या तिन्हींचा एकत्रित प्रयत्न आवश्यक आहे. जागरूकता, पारदर्शकता आणि कठोर कारवाईमुळेच हा धोका कमी होऊ शकतो. अशा उपायांनीच भारत सुरक्षित आणि विश्वासार्ह बाजार राखू शकेल. दर्जाहीन-बनावट औषधांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील उद्योगांचे नियमन करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रमुख म्हणजे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन-सीडीएससीओ) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि त्याच्या प्रभावीपणाची तपासणी करणे, नवीन औषधांना मान्यता देणे, क्लिनिकल ट्रायल्सचे निरीक्षण करणे आणि औषधांच्या आयात-निर्यातीस परवानगी देणे ही तिची मुख्य जबाबदारी आहे. प्रत्येक राज्यातही राज्य औषध नियंत्रण-नियमन यंत्रणा कार्यरत असतात.cough medicine त्या स्थानिक स्तरावर औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर नजर ठेवतात. या संस्थांच्या कार्यामुळे औषधांचा दर्जा टिकवून ठेवला जातो आणि बनावट अथवा निकृष्ट औषधे बाजारात येण्यापासून रोखली जातात. अनेक वेळा कर्मचाऱ्यांचा अभाव, तांत्रिक मर्यादा आणि प्रशासकीय अकार्यक्षमता यामुळे नियमन प्रभावीपणे राबवले जात नाही. या क्षेत्रात भ्रष्टाचार पण आहे. याचा फायदा अपप्रवृत्तीचे लोक आणि औषध निर्मात्यांकडून घेतला जातो. त्यांचे दर्जाहीन किंवा बनावट उत्पादन बाजारात येते आणि जातो, तो अबोध-निष्पाप बालकांचा बळी! कधी मोठ्यांचाही. त्यामुळे दर्जेदार औषध बाजारात जावे, याची काळजी सर्वच यंत्रणांनी घेतली तरच उपचार यशस्वी होतील. त्यासाठी औषधांवरच कठोर ‘उपचार’ करण्याची गरज आहे.