कोलकाता,
Dhirendra Shastri बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या प्रस्तावित कार्यक्रमाबाबत मोठे वक्तव्य केले असून, "जोपर्यंत ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत मी पश्चिम बंगालमध्ये हनुमान कथा करणार नाही," असे ठामपणे सांगितले आहे. कोलकात्यामध्ये १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणारी हनुमान कथाची तारीख आधीच निश्चित झाली होती, मात्र प्रशासनाने अचानक परवानगी रद्द केल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
रविवारी रायपूर येथे एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी परवानगी नाकारण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “आम्हाला बंगालमध्ये कथा करायची होती, सर्व तयारी झाली होती, पण अचानक परमिशन रद्द झाली. सांगण्यात आले की, प्रशासनाकडून परवानगी मिळू शकत नाही. आम्ही कोणाचे नाव घेणार नाही, पण हे सर्व कोणाच्या आदेशाने झाले, ते स्पष्ट आहे.”
शास्त्री यांनी पुढे सांगितले की, “आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. आम्ही ना कुणाच्या विरोधात आहोत, ना समर्थन करत आहोत. आम्ही केवळ सनातन धर्माच्या बाजूने आहोत आणि प्रभु श्रीराम व हनुमानाच्या कार्यात लीन आहोत. जेव्हा परमेश्वराची इच्छा असेल, तेव्हा बंगालमध्ये कथा होईल.”या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “जोपर्यंत दीदी (ममता बॅनर्जी) मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही बंगालमध्ये पाऊल ठेवणार नाही. जेव्हा ‘दादा’ येतील, तेव्हा नक्की जाऊ. सध्या आम्ही हा विषय भगवंताच्या इच्छेवर सोडला आहे.”
कोलकात्यातील या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने भक्तगणांची उपस्थिती अपेक्षित होती. आयोजकांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील विविध ठिकाणी जागेच्या शोधासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु कोणत्याही ठिकाणी परवानगी मिळू शकली नाही. अखेर प्रशासनाकडून आलेल्या कळवणीनंतर संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्यात आला.धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या अनुयायांना आवाहन केले आहे की, या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय चष्म्याने न पाहता केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहावे. “परमेश्वराला जेव्हा योग्य वाटेल, तेव्हाच कार्य घडेल. तोपर्यंत आम्ही वाट पाहू,” असे ते म्हणाले.या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये धार्मिक कार्यक्रमांना मिळणाऱ्या प्रशासनाच्या परवानग्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याशिवाय शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणातही हलचाल निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.