बुलढाणा,
Bavanbir stone pelting संग्रामपूर तालुयातील बावनबीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी आज गावाला भेट देऊन पाहणी केली.मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद होऊन दगडफेक झाल्याच्या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेत २० ते २५ जण जखमी झाल्याची माहिती असून पोलिसांकडून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत दोन्ही मंत्र्यांनी बावनबीर गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली.या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव आणि सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी नागरिकांना सण उत्सव शांततेत आणि एकोप्याने साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाला आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले.दरम्यान, गावातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.