श्याम पांडे
दारव्हा,
bhulabai festival, भाद्रपदाचा महिना आला. मुलींना आनंद झाला. पार्वती म्हणे शंकराला ‘चला हो माझ्या माहेराला’. या उत्सवात गाणे गायली जातात. भुलाबाई भुलोजीचा उत्सव शहरी भागातून कमी जरी झाला असेल तरी ग्रामीण भागामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
या उत्सवामुळे मुलींमध्ये चैतन्य निर्माण होते. भुलाबाई म्हणजे ‘परब्रह्मस्वरूपिनी देवी पार्वती’. एका आख्यायिकेनुसार पार्वतीकडून सारीपाटात सर्व काही हरल्यावर भगवान शंकर रुसून कैलास सोडून निघून जातात. माता पार्वती अथक प्रयत्न करून त्यांना परत आणतात आणि आपल्या माहेरी घेऊन येतात.भगवान शंकरांच्या येण्याने संपूर्ण वातावरण आनंदी होऊन जाते आणि भुलाबाईच्या उत्सवाला सुरवात होते. काही भागांत हा उत्सव एक एक महिन्याचा असतो. भाद्रपद पौर्णिमा (अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस) ते अश्विन पौर्णिमा (कोजागरी) पर्यंत राहतो. काही ठिकाणी हा उत्सव पाच ते दहा दिवसपर्यंत करतात.या उत्सवात भुलाबाई भुलोजीच्या मूर्तीची स्थापना करतात. संध्याकाळी घराजवळील परिसरातील मुली मैत्रिणी टिपèया घेऊन भुलाबाई भुलोजीची गाणी गातात,
यादवराया राणी रुसुन बसली कैसी,
सासुरवासी सून घरात येईना कैसी ।।
आपे दूध तापे त्यावर पिवळी साय,
लेकी भुलाबाई साखèया लेवून जाय ।।
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता,
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता ।।
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होते ताम्हण
भुलोजिला लेक झाला नाव ठेवा वामन ।।
अशा गाण्यांच्या सरतेशेवटी म्हणतात, ‘बाणा बाई बाणा, सुरेख बाणा, गाणे संपले खिरापत आणा, आणा-आणा लवकर जाऊ द्या लवकर’. डबे वाजवून खाऊ ओळखावे लागतात. अशा पद्धतीचे गाणे गाऊन खिरापत ओळखली जाते. असा हा मुलींचा उत्सव.
या उत्सवाचा उद्देश म्हणजे मुलींना खेळायला मिळावे हा असतो. यानिमित्त मैत्रिणींचा सहवास मिळावा, मनसोक्त हसता यावं, यासाठी अनादी काळापासून हा उत्सव साजरा होत असून या उत्सवाची सांगता कोजागरीला होते.
पूर्वीच्या काळी स्त्रिया-मुलींना रोजच्या कामातून वेळ मिळावा, त्यांना खेळायला मिळावं हा एक उद्देश आहे. खेळासोबतच त्यांच्या मनातले वेगवेगळे ताणतणाव दूर होतात. कोजागरी पौर्णिमेला दूध आटवतात. चंद्राचे प्रतिबिंब त्यामध्ये आले की दूध वितरण करतात. या दुधाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक आहे, अशी मान्यता आहे.