मुंबई
girish mahajan राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान, जनावरे मृत्यूमुखी पडणे आणि घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपापल्या पातळीवर मदत आणि भरपाई जाहीर केली असली, तरी विरोधक सरकारवर टीका करत आंदोलनाच्या तयारीत आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठाकरेंच्या आंदोलनाच्या तयारीवर “ही सगळी केवळ मगरमच्छाचे अश्रू आहेत,” अशी टीका केली आहे.गिरीश महाजन म्हणाले, “सत्तेत असताना वेगळी भाषा, विरोधात गेल्यावर वेगळी भूमिका घेतली जाते. जेव्हा राज्यात कोविडसारखी महाभयंकर साथ पसरली होती, तेव्हा उद्धवजी स्वतः मुख्यमंत्रिपदावर होते. पण त्यावेळी ते एकदाही घराबाहेर पडले नाहीत. हजारो लोकांचा मृत्यू होत असताना, त्यांनी फक्त घरबसल्या संगणकावरून सगळं पाहिलं. तेव्हा कुठे होती ही संवेदनशीलता?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाजन यांनी ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत म्हटलं, “जेव्हा लोक मरत होते, तेव्हा त्यांच्या महापालिकांमध्ये किती भ्रष्टाचार झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. आज मात्र ते अश्रू ढाळत आहेत, तेही खोटे. मी स्पष्टपणे म्हणेन की हे सगळं ‘मगरमच्छ के आसू ’ आहेत.”
तसंच उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, असा आरोप करत महाजन म्हणाले, “त्यांचं धोरण नेहमीच ‘माझा पक्ष, माझं कॉर्पोरेशन, माझी दुकानदारी’ असं राहिलं आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी ना मंत्रालयात पाऊल टाकलं ना विधानभवनात आले. जेव्हा संपूर्ण राज्याला नेत्याची गरज होती, तेव्हा ते म्हणाले की मी घरातूनच सर्व पाहणार. आज मात्र शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण सुरू आहे.”दरम्यान, सत्ताधारी शिंदे-फडणवीस-आंबेकर सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं. “सध्याची सरकार ही अत्यंत संवेदनशील असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचं काम सुरू आहे,” असं ते म्हणाले.
राज्यातील वाढत्या नैसर्गिक आपत्ती, आगामी निवडणुका आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अशातच या वादविवादांमुळे सरकार आणि विरोधकांमध्ये टोकाचे आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत. आगामी काळात हे आंदोलन आणि सरकारची मदतीची कृती यावर खऱ्या राजकीय नाट्याचा उत्कर्ष अवलंबून राहणार आहे.