श्रीनगर,
weather alert, जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसासह उंच भागांमध्ये झालेल्या पहिल्या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यातील अनेक भागांत रात्रभर जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला असून, उंच भागांमध्ये बर्फ साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू विभागातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारपर्यंत हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर काश्मीरच्या उंच भागांत बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू विभागातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, काश्मीरच्या काही भागांतही मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.या अचानक बदललेल्या हवामानामुळे कृषी क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, हवामान खात्याने शेतकऱ्यांना ६ आणि ७ ऑक्टोबर दरम्यान शेतीसंबंधित सर्व कामे पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपर्यंत (७ ऑक्टोबर) पावसाचा जोर राहणार असून, त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून हवामानात सुधारणा होण्याची शक्यता आहे. ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विशेषतः काश्मीर, चिनाब खोरं आणि पीर पंजाल पर्वतरांगेत उंच भागांत हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून, दक्षिण काश्मीर आणि चिनाब घाटीतील काही भागांत मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होऊ शकते. यामुळे दरडी कोसळण्याची आणि खडका सरकण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज सकाळी गुलमर्ग, सिंथन टॉप, साधना दर्रा आणि राजदान टॉप यांसारख्या उंच भागांमध्ये हिवाळ्यातील पहिली बर्फवृष्टी नोंदवण्यात आली. त्याचबरोबर श्रीनगरसह इतर मैदानी भागांतही रविवारी उशिरापासून पाऊस सुरू आहे.
हवामानाच्या या प्रतिकूल स्थितीचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून, बांदीपोरा-गुरेज आणि अनंतनाग-किश्तवाड मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. राजदान टॉप आणि सिंथन टॉप येथे बर्फवृष्टीनंतर खबरदारी म्हणून हे निर्णय घेण्यात आले. मात्र, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग, ऐतिहासिक मुगल रोड आणि श्रीनगर-लेह महामार्गावरील वाहतूक अद्याप सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्रशासनाकडून सर्व नागरिकांना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, विशेषतः उंच भागांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवर्जून सांगण्यात आले आहे.