दोन उपमुख्यमंत्रींमुळे पंढरपूरच्या कार्तिकी महापूजेवर प्रश्नचिन्ह!

06 Oct 2025 10:51:10
मुंबई,
Kartik Maha Puja of Pandharpur आषाढी एकादशी नंतर कार्तिकी एकादशीची तयारी पंढरपूरत सुरू झाली असून, यंदाच्या महापूजेच्या संदर्भात चर्चेला उधाण आले आहे. विठ्ठल मंदिर समितीसमोर राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकी महापूजा पार पडणार, हा प्रश्न उभा राहिला आहे. पंढरपूरच्या परंपरेनुसार, आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते, तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडते. मात्र, राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा असलेला प्रसंग समितीला विचारमंथनास भाग पाडत आहे.
 
 
Kartik Maha Puja of Pandharpur
गेल्या वर्षी, २०२४ मध्ये कार्तिकी यात्रा दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होऊ शकली नाही; त्या वेळी पुणे येथील विभागीय आयुक्त कुलकुंडवार यांनी महापूजा पार पाडली. यंदा जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता असल्याने, निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीनेच उपमुख्यमंत्र्यांना पूजा करण्याची संधी मिळेल.
 
इतिहास पाहिला तर २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेमुळे चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते महापूजा पार पडली होती. या पद्धतीनुसार, आचारसंहिता लागू असली तरी निवडणूक आयोगाच्या परवानगीने उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी महापूजा करण्याची मुभा राहील. मात्र, यंदाच्या उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण करणार, याचा अंतिम निर्णय शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिला जाणार आहे. या निर्णयानंतर मंदिर समिती संबंधित उपमुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण देईल.
Powered By Sangraha 9.0