कोण होणार तुमचा नगराध्यक्ष....वाचा एका क्लिकवर...

06 Oct 2025 14:43:37
मुंबई,
Maharashtra Nagarparishad Reservation राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (६ ऑक्टोबर) मुंबईत एक महत्त्वाची प्रक्रिया पार पडली. राज्य निवडणूक आयोगाने एकूण २४७ नगरपरिषद आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली. या सोडतीमुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार यावर स्थानिक राजकारणाचा थेट प्रभाव पडतो. त्यामुळे या सोडतीकडे राज्यातील सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष लागले होते.
 
हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न 
 
 
Maharashtra Nagarparishad Reservation
 
महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व
या सोडतीत महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. ६८ नगरपरिषदांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नगराध्यक्षपदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यात परळी वैजनाथ, मुखेड, अंबरनाथ, अचलपूर, पंढरपूर, खामगाव, बार्शी, गडचिरोली, भंडारा, सावनेर, मंगळवेढा, कागल, संगमनेर, साकोली, रत्नागिरी, पन्हाळा, वसमत, जामनेर, तासगाव, राजापूर, सावंतवाडी अशा अनेक नगरपरिषदांचा समावेश आहे. याशिवाय, ३४ नगरपरिषदांमध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात भगूर, विटा, बल्हारपूर, धाराशिव, जुन्नर, उमरेड, दौड, हिंगोली, काटोल, माजलगाव, मालवण, अकोट, मोर्शी, चोपडा, देगलूर, वरोरा, रोहा, कुरडुवाडी आणि इतर अनेक नगरपरिषदांचा समावेश आहे.
 
अनुसूचित जातींच्या महिलांसाठी १६ नगरपरिषदा राखीव
आरक्षण सोडतीनुसार, १६ नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातींच्या महिलांसाठी नगराध्यक्षपदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यात देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, भुसावळ, चिमूर, शिर्डी, सावदा, बीड, शिरोळ, दिग्रस, अकलूज अशा महत्त्वाच्या नगरपरिषदांचा समावेश आहे.
 
नगरपंचायतींची सोडतही जाहीर
नगरपरिषदांसोबतच १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांसाठीही आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि खुला महिला प्रवर्ग असे विविध आरक्षणाचे गट ठरवण्यात आले आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव नगरपंचायतींमध्ये पारनेर, तळा, घनसावंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, खानापूर, माढा, पोलादपूर, आटपाडी, खालापूर, मालेगाव जहांगीर, शिरूर अनंतपाळ, सावली, विक्रमगड, अकोले, मोखाडा आणि कर्जत-अहिल्यानगर या प्रमुख नगरपंचायतींचा समावेश आहे.
 
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नगरपंचायती
तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव नगरपंचायतींमध्ये मोहडी, बार्शी टाकळी, वाशी, नांदगाव खंडेश्वर, गुहागर, राळेगाव, लाखांदूर, वैराग, सोयगाव, महादूला, पेठ, कडेगाव, औंढा नागनाथ, रेणापूर, म्हसळा, देवरुख, लांजा, सिंदखेडा, शहापूर, देहू, मुक्ताईनगर आणि कुही यांचा समावेश आहे.
 
राजकीय हालचालींना वेग
या आरक्षण सोडतीनंतर अनेक ठिकाणांवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांनी पुढील रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः महिलांसाठी आरक्षित जागा वाढल्याने महिला नेत्यांना सत्तास्थानी येण्याची संधी निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, आज घोषित झालेल्या आरक्षण सोडतीनंतर स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांचा ताजा रंग दिसू लागला आहे.
Powered By Sangraha 9.0