तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
mangesh bhende आजच्या काळात कुटुंबातील एकता टिकवणे ही समाजरचनेची पहिली पायरी आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबाने आठवड्यातून एकदा तरी सर्व सदस्यांनी एकत्र भजन, भोजन, भाषण करावे आणि परस्परांमध्ये प्रेमपूर्वक संवाद साधावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे यांनी केले. यवतमाळ येथील पोस्टल मैदानावर रविवार, 5 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या यवतमाळ नगराच्या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळचे प्रसिद्ध उद्योजक आशिषकुमार बाफना, जिल्हा संघचालक विलास देशमुख, नगर संघचालक धनंजय पाचघरे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख वक्ता म्हणून बोलताना मंगेश भेंडे पुढे म्हणाले, आधुनिक काळात अनेक कुटुंबांमध्ये मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने ते चुकीच्या मार्गाला लागतात. परिवार मजबूत राहिला नाही, तर समाज कधीही बलवान होऊ शकत नाही. मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त करीत या सर्व गोष्टी सुधारण्यासाठी आपल्या परिवाराची शक्ती वाढवावी लागेल. संघटनात्मक कार्य हे केवळ काहींसाठी नसून संपूर्ण समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे. तुम्हाला जगाचा उद्धार करायचा असेल, तर प्रथम स्वतःचा उद्धार करा. ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा आपला मंत्र प्रत्येक घराघरात रुजायला हवा, असे आवाहन मंगेश भेंडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आशिषकुमार बाफना यांनी समाजातील समर्पण, योग, आणि अध्यात्मिक विकास यांचे महत्त्व अधोरेखित करीत शिक्षण आणि समाजसेवा ही राष्ट्रविकासाची खरी साधने असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलाविल्याबद्दल आभार मानले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यवतमाळ नगर विजयादशमी उत्सवापूर्वी कार्यक्रम स्थळापासून पथसंचलन करण्यात आले.mangesh bhende कार्यक्रमामध्ये प्रदक्षिणा संचलन, सामूहिक समता, दंड क्रमिका, योगासन, दंड युद्ध, सांघिक दंड योग आणि व्यायामयोग, शारीरिक कवायतींच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी सादर केले. वैयक्तिक गीत संजीव जोशी, सुभाषित पीयूष दुधनकर, अमृतवचन अभिषेक पांडे यांनी, तर कार्यक्रमाचे संचालन शारीरिक प्रमुख क्रांती अलोणे यांनी आणि प्रास्ताविक, परिचय, आभारप्रदर्शन नगर कार्यवाह अर्जुन खर्चे यांनी केले. या यवतमाळ नगर विजयादशमी उत्सवास महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांमधील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.