हिंदुत्वाच्या विचाराने भारत वैभवशाली होणार: अमित मोडक

07 Oct 2025 19:42:25
अर्जुनी मोरगाव, 
Amit Modak : हिंदू समाज उत्सव प्रिय आहे. उत्सवांना महत्त्वाचे स्थान आहे. विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमीला महत्त्व आहे. नऊ दिवस शक्तीची उपासना करून प्राप्त शक्तीने दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळविणे ही आपली संस्कृती. दुर्बलांचा बळी दिल्या जातो. म्हणून शक्ती संपन्न व्हा. प्रभू श्रीरामांनी सामान्य लोकांचे संघटन उभे करून सक्ती संपन्न रावणाच्या वध केला. हजारो वर्षांपूर्वी भारत वैभवशाली होता. विश्वाला विज्ञान व अध्यात्म दिला. सुश्रृत संहिता, चरख संहिता, स्थापत्यशास्त्र भारताने विश्वाला दिले. मात्र हिंदू समाज असंघटित, आत्मकेंद्रीत झाला हे हेरून परकीय आक्रमणकार्‍यांनी भारताला गुरमगिरीत टाकले. देव, देश, धर्म नष्ट करण्याचे काम केले. अनेक वर्षाच्या गुलामगिरी नंतरही भारत आज विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे फलित संघटित हिंदुत्वाचे आहे. हिंदुत्वाची विचारधारा भारताला वैभवशाली करेल असे विचार पांढरकवडा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रांत घोष प्रमुख अमित मोडक यांनी मांडले.
 
 
 
RSS
 
 
 
ते अर्जुनी मोरगाव येथे संघाच्या विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सवाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथिस्थानी प्रतापभाई जीवाणी, तालुका कार्यवाह देवानंद गजापुरे, मनोहर शहारे, प्रेम शहारे, कृष्णा लंजे उपस्थित होते. मोडक पुढे म्हणाले, भारतीय पारतंत्र्याची कारणे डॉ. हेडगेवार यांनी शोधली. विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी संघाची स्थापना केली. हिंदू समाज विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारा समाज. लार्ड मेकालेच्या शिक्षण पद्धतीने देशाची संस्कृती नष्ठ झाली. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा भारतीय समाज मनावर पडला.
 
 
विदेशात भजने होतात मंदिरे बनू लागली. विदेशी महिला साड्या वापरू लागली. आपण कुठे आहोत या चिंतनाची गरज आहे. या सर्व विपरीत परिस्थितीला सुधारण्यासाठी संघ स्वयंसेवक व्यवस्था परिवर्तनासाठी काम करीत आहे. हजारो वर्षाची अमरनाथ यात्रा, रामसेतू संरक्षण आणि साडेपाचशे वर्षापासून प्रतिक्षेत असलेले रामलल्लांचे धाम संघ शताब्दी वर्षाचे फलित आहे. समाज आज संघाला स्वीकारतोय. भारत जगाचे नेतृत्व करतोय. कोरोना लस विश्वाला मोफत दिली. दोन देशातील युद्ध संपवण्यासाठी भारताला मध्यस्थी घालण्याची विनंती करतात. पर्यावरण, कुटुंब व्यवस्था, व्यवस्था परिवर्तन, सामाजिक समरसता, नागरी शिष्टाचार आणि स्वदेशी जागरण या पंचसूत्रींकरिता स्वयंसेवकांनी कार्य करण्याचे आवाहन मोडक यांनी यावेळी केले.
 
 
नियोजित कार्यक्रमात अवकाळी पावसाने व्यत्यय आणला. मात्र पावसाची तमा करता भर पावसात स्वयंसेवकांनी दुर्गा चौक ते वात्सल्य सभागृहापर्यंत पथसंचलन करीत शस्त्र पूजन केले. ध्वज वाहकाचे कार्य राधेश्याम भेंडारकर यांनी पार पाडले. यशस्वीतेसाठी तालुक्यातील गणवेशधारी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0