अग्रलेख
audio visual माध्यमविश्वात दृक्-श्राव्य प्रसारणाचे युग सुरू झाल्यापासून विशेषतः राजकीय क्षेत्रांतील नेतेमंडळींची मोठी पंचाईत होऊ लागली. त्याआधी, जेव्हा नेत्यांनी बोलावयाचे व माध्यमांच्या प्रतिनिधींनी, ‘ते असे म्हणाले, असे त्यांना सांगितले, ते पुढे असेही म्हणाले’ असे काही मोजके शब्द पेरून त्यांच्या वक्तव्याची बातमीदारी करण्याचा एक जमाना होता, तेव्हा ‘मी असे बोललोच नाही, मी असे काही सांगितलेलेच नाही’, असा बचाव करून आपल्याच वक्तव्यामुळे अडचणीत आल्यानंतर त्यातून मुक्तता करून घेण्याचा एक हमखास मार्ग राजकीय नेत्यांना असायचा. ‘माझ्या बोलण्याचा माध्यमांनी विपर्यास केला, वक्तव्याची मोडतोड केली किंवा मला असे म्हणायचेच नव्हते’ असे सांगत आपल्याच वक्तव्यापासून घूमजाव करणाऱ्या अनेक नेत्यांचे त्या काळी फोफावणारे मुबलक पीक दृक्-श्राव्य प्रसारणाचा शिरकाव झाल्यानंतर मात्र अचानक रोडावत गेले.
आता कॅमेऱ्यासमोर केलेल्या वक्तव्याची सारी जबाबदारी आपल्याला घ्यावीच लागते हे जाणवू लागल्यामुळे राजकीय क्षेत्रातील नेतेगिरी करणाऱ्यांना कोणतेही वक्तव्य करण्याआधी दहा वेळा विचार तरी करावा लागतो किंवा आपल्या एखाद्या बेधडक विधानाचे काय परिणाम होऊ शकतात याचे भान तरी ठेवावेच लागते. त्यातूनही एखाद्या वक्तव्याची किंवा कॅमेऱ्यासमोर केलेल्या कृतीची आपल्याला किंमत मोजावी लागणार असे दिसलेच, तर त्यापासून बचाव करण्यासाठी दृक्-श्राव्य साधनपूर्व काळातील ती हुकमी वाक्ये वापरून पळ काढण्याची कसरत करणारे नेतेही पाहावयास मिळतात. त्यामुळे, आता दृक्-श्राव्य प्रसारणाच्या जमान्याचे महत्त्व कमालीचे वाढले असून, त्यामध्येही मोडतोड करण्याचे प्रकारही वाढीस लागल्याने पुन्हा माध्यमांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्हे उभी करून सुटका करून घेण्याचेही प्रयत्न केले जातात. त्यामुळे, वादग्रस्त वक्तव्ये करणाèयांप्रमाणेच, त्याची मोडतोड करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेचाही प्रश्न निर्माण होतो.
काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री व गृहमंत्री या नात्याने देशाच्या एका नाजूक कसोटीच्या काळात जबाबदारी खांद्यावर पडलेले नेते पी. चिदम्बरम् यांनी अलिकडेच एका वृत्तवाहिनीच्या पॉडकास्ट प्रसारणास दिलेल्या एका मुलाखतीमुळे मोठी खळबळ माजली आहे. इकडे भारतात त्यांची मुलाखत प्रसारित होत असताना, त्याच दरम्यान काँग्रेसचे सर्वेसर्वा नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोलंबियामधील एका विद्यापीठात भारताचे भविष्य किंवा अशाच काही विषयाच्या अनुषंगाने आपली मते श्रोत्यांच्या गळी उतवरत होते. भारतातील लोकशाही संकटात असल्याचा त्यांचा आवडता सिद्धान्त आहे. जेव्हा जेव्हा परदेशातील कोणत्याही मंचावर त्यांना भाषणाची किंवा संवादाची संधी मिळते, तेव्हा तेव्हा त्यांनी हा सिद्धान्त ठासून श्रोत्यांसमोर मांडला आहे. भारताची सांस्कृतिकता, विविधता हे देशाचे पारंपरिक वैशिष्ट्य आहे आणि विविधतेतील एकता भारताची ताकद आहे, हा सांस्कृतिक सिद्धान्त त्यांना मान्य नाही. भारताकडे जागतिक नेतृत्वाची क्षमता नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. कोलंबियातही त्यांनी भाषणाचा व संवादाचाही तोच सूर लावलेला असताना इकडे पी. चिदम्बरम् यांनी त्या मुलाखतीत काँग्रेसच्या बोटचेप्या धोरणाची संयत शब्दांत चिरफाड करत स्वपक्षाला घरचा आहेर दिला आणि सध्याच्या नेतृत्वावर टीकेचे बाण सोडणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेसच्या सत्ताकाळातील शरणागत मानसिकतेतून आलेल्या दुबळेपणाचे पितळही उघडे पडले. मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 चा दहशतवादी हल्ला हा भारताच्या मनावरील एक भळभळती जखम आहे. शिथिल सुरक्षा भेदून कोणीही सहजपणे देशात प्रवेश करावा आणि निरपराध नागरिकांना गोळ्या घालून ठार करावे, एवढ्या सहजपणे पाकिस्तानच्या पाठिंब्याने मूठभर अतिरेक्यांनी केलेल्या त्या हल्ल्याच्या वेदना अजूनही भारतीयांना अस्वस्थ करतात. त्या मुलाखतीदरम्यान काँग्रेससमोर आरसा धरत पी. चिदम्बरम् हे त्या हल्ल्यानंतरच्या मानसिकतेचे पदर नेमकेपणाने उलगडत होते, तेव्हा तिकडे राहुल गांधी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत भारताच्या बदनामीची मोहीम राबवत होते. पण मोदी यांची ‘सरेंडर मोदी’ अशा अवमानकारक शब्दांत संभावना करणाऱ्या राहुल गांधींची काँग्रेस अमेरिकेच्या विनंतीस मान देऊन पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या देशाच्या अपेक्षांना कशी पाने पुसत होती, ते चिदम्बरम् यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले व काँग्रेसच्या शरणागत मानसिकतेवर पुरेसा प्रकाशझोत पडला.
त्या अतिरेकी हल्लेखोरांवरील कारवाई पूर्ण होऊन अखेरच्या अतिरेक्यास कंठस्नान घातले गेले आणि तिकडे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला. ते पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करून बाहेर पडत असतानाच, पी. चिदम्बरम् यांनी पंतप्रधान कार्यालयातील दालनात प्रवेश केला आणि अनपेक्षितपणे पंतप्रधानांनी त्यांच्या शिरावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली. हा घटनाक्रम त्या मुलाखतीत चिदम्बरम यांनीच उघड केला आहे. देशाच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेललेल्या चिदम्बरम् यांना ही जबाबदारी अनपेक्षित तर होतीच, पण देशावरील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यावा याची कसोटी पाहणारीदेखील होती. शेकडो निरपराध्यांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यातील पाकिस्तानी सहभागाची कबुली प्रत्यक्ष पाकिस्तानकडून मिळालेली असताना, भारताने अशा हल्ल्याचा बदला घ्यायला हवा असा सूर देशात उमटत होता, तेव्हा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मात्र, युद्ध नको अशी भूमिका घेत अनेकांच्या अपेक्षांना पाने पुसली, हेदेखील चिदम्बरम् यांच्या त्या मुलाखतीतून स्पष्ट झाले. भारताने पाकिस्तानशी युद्ध करून त्यांच्या कृत्याचा धडा शिकविला पाहिजे, असे आपले वैयक्तिक मत होते, पण पंतप्रधानांनी आणि पक्षश्रेष्ठींनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला, त्यातच अमेरिकेच्या वरिष्ठ वर्तुळाकडूनही सबुरीने घेण्याची विनंती करण्यात आली, असे सूचकपणे सांगून चिदम्बरम् यांनी त्या कठीण काळातील सरकारच्या भूमिकेचे सावधपणे समर्थनही केले, तेव्हा आपण कॅमेऱ्यासमोर बोलत आहोत, याचे भान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेले जनतेने पाहिले. त्यांच्या या खुलाशानंतर साहजिकच, ऑपरेशन सिंदूर घडवून पहलगाम येथील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणाऱ्या मोदी सरकारवर शरणागतीचा आरोप करणाऱ्यां राहुल गांधी यांची देशाला आठवण झाली. चिदम्बरम् यांच्या त्या खुलाशानंतर, मोदी यांच्यावरील शरणागतीच्या आपल्या आरोपाची राहुल गांधी यांनाही कदाचित आठवण झाली असेल, पण परदेशातील दौऱ्यांत प्रथेप्रमाणे मोदी सरकारच्या नावाने बोटे मोडण्याच्या मोहिमेवर असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे.
पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमाभंजनाचा एकमेव कार्यक्रम राबविताना, काँग्रेसला स्वत:च्या प्रतिमानिर्मितीचा विसर पडला आहे, असे अलिकडच्या अनेक निवडणुकांतून पदरी पडलेल्या पराभवांतून स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी जेव्हा जेव्हा देशाबाहेर जातात, तेव्हा तेव्हा देशाची बदनामी करण्याची संधी ते सोडत नाहीत असा आरोप त्यांच्यावर केला जातो. कोलंबियाच्या दौऱ्यातील त्या भाषणात त्यांनी चीनच्या यशाचे गमक उघड केले. उत्पादन क्षेत्रात चीनने जागतिक स्पर्धेत बाजी मारली असून भारत मात्र केवळ सेवाक्षेत्राच्या बळावर मोठे होण्याची स्वप्ने पाहात असल्याचा नकारात्मक सूर लावणाऱ्या राहुल गांधींना कोलंबियातच, भारतात उत्पादित झालेल्या दर्जेदार दुचाकींचे दर्शन घडले आणि भारतातील उत्पादनांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मिळविलेल्या प्रतिष्ठेची त्यांना जाणीवही झाली. भारताच्या उत्पादनक्षेत्राच्या कमकुवतपणावर बोट ठेवत असतानाच त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या या प्रतिष्ठेचा अभिमान त्यांच्या वक्तव्यातून उमटेल, असे तेव्हा वाटले होते, पण त्यांनी केवळ नकारात्मकतेचा सूर लावला आणि भारताला भविष्य नाही, असे संकेत देणारे निराशाजनक भविष्य वर्तविले. एका बाजूला भारताची जागतिक स्पर्धेत उतरण्याची जोरदार तयारी सुरू असताना, विदेशी मंचावरून भारताच्या या तयारीला गालबोट लावण्याच्या मानसिकतेतून व मोदी सरकारचे प्रतिमाभंजन करण्याची मोहीम राबविण्याच्या या राजकारणातून काँग्रेसची प्रतिमानिर्मिती होईल ही अपेक्षा करणे गैरच ठरेल.