तभा वृत्तसेवा
पाटणबोरी,
janhvi-dagaonkar : राष्ट्राचा सर्वांगीण विकास होताना भारतमातेला विश्वगुरूपदी आरुढ करण्याकरिता राष्ट्राला समर्पित व्यक्तित्व घडले पाहिजे, हाच ध्यास घेऊन राष्ट्रसेविका समिती गेली 90 वर्षे कार्य करीत आहे, असे प्रतिपादन रा. से. समितीच्या जिल्हा बौद्धिक प्रमुख जान्हवी डगावकर यांनी केले.
रा. से. समितीच्या पाटणबोरी नगराच्या विजयादशमी उत्सवात त्या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. रा. से. समितीतर्फे श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या प्रांगणात विजयादशमी उत्सव तथा शस्त्रपूजनाचे आयोजन रविवार, 5 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.
उत्सवापूर्वी रा. से. समितीच्या सेविकांनी श्रीराम मंदिरापासून उत्सव स्थानापर्यंत गणवेशात शिस्तबद्ध पथसंचलन केले. यावेळी अनेक नागरिकांनी पथसंचलनावर पुष्पवर्षाव करत संचालनाचे स्वागत केले.
कार्यक्रमस्थळी शस्त्रपूजन करण्यात आले, स्वागत प्रणामनंतर प्रमुख अतिथी अर्चना राजू तोडसाम यांचे मनोगत झाले. प्रास्ताविक अनुराधा सरमोकद्दम, श्लोक सृष्टी सुरडकर, अमृतवचन स्वाती भागानगरकर, वैयक्तिक गीत शिल्पा सत्तुरवार, तर आभार प्राची गोसावी यांनी मानले. सामूहिक वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.