तभा वृत्तसेवा
हदगाव,
entry-of-workers-into-bjp : शहरातील शासकीय विश्रामगृहात 2 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख व राज्य परिषद सदस्य शिरीष मनाठकर हे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हदगाव शहर व परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली.
या प्रसंगी जिल्हा चिटणीस तातेराव वाकोडे, जिल्हा चिटणीस सुप्रिया मुनेश्वर, भाजपा पदाधिकारी बाळा कदम, उमाकांत भवरे, माजी नगरसेवक सचिन सूर्यवंशी, भाजपा युवा अध्यक्ष साई बाभुळकर, गुणवंत काळे, भाजपा माजी शहराध्यक्ष मारुती सूर्यवंशी, बाळू शंकुरवार, सुधाकर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी अभिनंदन केले.
यावेळी पक्षाच्या वाढत्या कार्याचा एक भाग म्हणून पदवीधर मतदार नोंदणी अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात आला. जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
पदवीधर मतदार नोंदणीचा शुभारंभ
या प्रवेश सोहळ्यादरम्यान संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी अभियानाची औपचारिक सुरवात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी या अभियानाचे महत्व अधोरेखित करताना पदवीधर मतदारांनी जागरूकपणे नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी यासाठी गावागावात जाऊन माहिती द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.