गडचिरोली,
mla dr milind narote वन्यजीव आणि निसर्ग यांच्याशिवाय पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राहू शकत नाही. आज मानव विकासाच्या नावाखाली जंगलांची नासधूस करत आहे. यामुळे जलस्त्रोत आटत आहेत, तापमान वाढत आहे आणि जैवविविधता नष्ट होत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर आपण सर्वांनी निसर्गाशी सुसंगत राहून जगले पाहिजे. जंगल हे केवळ संसाधन नाही, तर आपल्या अस्तित्वाची जीवनरेखा आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.
ग्लोबल रिसर्च इन्व्हरमेंट एज्युकेशन अँड नेचर सोशल वेल्फेअर असोसिएशन गडचिरोली यांच्यावतीने वन्यजीव ग्रीन्स जंगल जत्रा हा जनजागृतीपर उपक्रम पीएमश्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक नगरपरिषद शाळा गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, सतीश चिचघरे, उपवनसंरक्षक आर्या, मुख्याध्यापक राजेश गोहणे, डीएफओ गणेश पटोले, राजेश इटनकर, शेमदेव चापले, पठाण, अंजली कुलमेथे तसेच ग्रीन्स संस्थेचे सदस्य, शिक्षकवृंद, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार डॉ. नरोटे म्हणाले, मुलांनी आणि युवकांनी ‘ग्रीन वॉरियर्स’ बनून झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संवर्धन केले पाहिजे. प्रत्येकाने वर्षातून किमान एक झाड जपले तर पुढील पिढीसाठी हरित वारसा आपण जपू शकतो. पर्यावरणाचे संतुलन राखणे ही केवळ शासनाचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जंगलातील प्रत्येक प्राणी, पक्षी, झाड आणि झुडूप हे निसर्गाच्या चक्रातील महत्त्वाचे घटक आहेत.mla dr milind narote त्यांचे संरक्षण म्हणजे आपल्या जीवनाचे संरक्षण आहे. अशा उपक्रमांद्वारे ग्रीन्स संस्था समाजात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करत आहे, हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल ग्रीन्स संस्थेच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.