भारत मातेला परम वैभव प्राप्त करून देणे हेच अंतिम ध्येय : पालिवाल

07 Oct 2025 20:26:31
कारंजा (घा.),
gopal-paliwal-rss : हिंदू समाजाने आपले सत्व विसरल्यामुळे परकीय आक्रमकांनी आपल्या देशाचे मोठे नुकसान केले आहे. जाती भेद, धर्म भेद, भाषा भेद, प्रांत भेद विसरून हिंदू समाजाचे संघटन करून समर्थ भारत उभा करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकमेव कार्य आहे. संघाने शताब्दी वर्षात प्रवेश केला. त्यामुळे समाजाने ईश्वरीय संघ कार्यास आपले आशीर्वाद व संघ कार्यात आपली सक्रियता असावी असे आवाहन रामटेक विभाग गौसेवा प्रमुख प्रमुख वक्ते गोपाल पालिवाल यांनी केले.
 
 
rss
 
भिवापूर हेटी शाखेचा हनुमान मंदिर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भीवापूर शाखेच्या विजयादशमी उत्सवात गोपाल पालीवाल प्रमुख वते म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय गळहाट होते. तर व्यासपीठावर खंड संघचालक सुनील कडू उपस्थित होते.
 
 
पालिवाल पुढे म्हणाले की, भारतमातेला विश्व गुरुपदी विराजमान करून परम वैभव प्राप्त करून देने हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंतीम ध्येय आहे. भारताला हजारो वर्षाची परंपरा आहे. भारत आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय प्रगत होता म्हणूनच भारताला ’सोने की चिडिया’ असे म्हटले जात होते. प्राचीन काळातील ऋषी मुनी हे वैज्ञानिकच होते. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली होती. वैद्य शास्त्र, विज्ञान, आरोग्य, कला, युद्धशास्त्र अशा प्रत्येक क्षेत्रात कीर्तीमान प्रस्थापित केले होते.
 
 
 
परंतु दुर्देवाने आपण आपला वैभवशाली इतिहास विसरलो. पराक्रमी महापुरुषांची वैभवगाथा विसरलो. परिणामी, आपण गुलामगिरीत गेलो. ही गुलामगिरी नुसती शारीरीक नव्हती तर वैचारिक सुद्धा होती. या सर्व बाबींचा अभ्यास करून डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज समाजाच्या
प्रत्येक क्षेत्रामध्ये संघ प्रेरनेने कार्य सुरू आहे. सेवाभारती, सहकार भारती, विद्या भारती, विद्यार्थी परिषद अशा जवळपास ३५ संघटना कार्य करीत असल्याचे ते म्हणाले.
 
 
सुभाषित प्रतीक भड, अमृत वचन भावेश गळहाट, सांघिक गीत अंश अवथळे तर प्रास्ताविक अनिकेत अवथळे यांनी केले. उत्सवाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0