उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निवडणूक रोखण्याच्या याचिकेवर नकार

07 Oct 2025 20:21:46
हिंगणघाट,
educational-institute-election : तालुक्यातील हिंगणघाट शिक्षण संस्था या संस्थेची निवडणूक ४ सप्टेंबर रोजी घेण्याचे आदेश सहाय्यक धर्मदाय आयुत वर्धा यांनी दिले. त्या आदेशावर शिक्षण संस्थेच्या दोन सभासदांनी मुंबई हायकोर्टच्या नागपूर खंडपीठात निवडणूक थांबविण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निवडणूक रोखण्याच्या मागणीला नकार देत व निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा तोच असेल असे आदेश दिल्याने आता हिंगणघाट शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांची निवडणूक ९ रोजी पार पडणार आहे.

 jk
 
 
 
या संबंधात प्राप्त माहितीनुसार, १९८५ मध्ये स्थापित झालेल्या हिंगणघाट शिक्षण संस्थामध्ये ११ सदस्य होते. त्यापैकी पाच सदस्यांचे निधन झाले. आता सहा सभासद आहेत. या सभासदांपैकी वासुदेव गौळकार, विजय बाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर न्यायमूर्ती किल्लोर व न्यायमूर्ती व्यास यांनी याचिकाकर्त्यांची मागणी अमान्य करीत निवडणूक कार्यरत कार्यक्रम पूर्ववत घ्यावे, असा आदेश दिला. या आदेशामुळे आता गुरुवार ९ रोजी या संस्थेची निवडणूक होईल.
 
 
विशेष म्हणजे, संस्थेचे सभासद अ‍ॅड. सुधीर कोठारी, ओमप्रकाश डालिया, दिनकर घोरपडे, नरेंद्र थोरात यांनी सहाय्यक धर्मदाय आयुत वर्धा यांच्याकडे या संस्थेची निवडणूक त्वरित घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. आदेशाच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सदर संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम घोषित केला. मात्र, त्यापैकी दोन सदस्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेत घोषित निवडणूक थांबवावी, असा शेवटचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न अयशस्वी झाला. निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. सुधीर कोठारी यांची नियुती सहाय्यक धर्मदाय आयुतांनी केली.
Powered By Sangraha 9.0