महाराष्ट्रसह चार राज्यांमध्ये १८ जिल्ह्यांना जोडणारे चार महत्वाचे रेल्वे प्रकल्प मंजूर
07 Oct 2025 16:18:00
नवी दिल्ली,
maharashtra-railway-project केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी चार महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मंजूर प्रकल्पांमध्ये वर्धा-भुसावळ तिसरा व चौथा मार्ग, गोंदिया-डोंगरगड चौथा मार्ग, वडोदरा-रतलाम तिसरा व चौथा मार्ग आणि इटारसी-भोपाळ-बीना चौथा मार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे २४,६३४ कोटी रुपये असून हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या चार राज्यांमधील १८ जिल्ह्यांना जोडतील आणि भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कमध्ये अंदाजे ८९४ किलोमीटरची भर घालतील.
या प्रकल्पांमुळे अंदाजे ८.५८४ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या सुमारे ३,६३३ गावांशी संपर्क सुधारेल. maharashtra-railway-project यात विदिशा (मध्य प्रदेश) आणि राजनांदगाव (छत्तीसगड) यांसारखे महत्त्वाचे जिल्हेही समाविष्ट आहेत, ज्यांना अधिक चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मल्टी-ट्रॅकिंगमुळे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची क्षमता वाढेल, रेल्वेचा वेग सुधारेल आणि विलंब कमी होईल. तसेच या प्रकल्पांमुळे आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल आणि या भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.