प्रकल्पग्रस्त 3 महिला आंदोलक चढल्या झाडावर...

07 Oct 2025 19:47:21
भंडारा,
bhandara-news : प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांना घेऊन 6 तारखेपासून सुरू झालेले आंदोलन आज चिघळले. आंदोलनकर्त्यांपैकी काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या झाडावर चढल्या. जोपर्यंत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉल द्वारा बोलून समस्यांचे समाधान काढत नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वृत्त लिहेस्तोर आंदोलक महिला झाडावर होत्या.
 
 
 
bhandara
 
 
 
गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित झालेल्या भंडारा तालुक्यातील 27 गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून रेंगाळत आहे. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने यासाठी वारंवार आंदोलन केले जाते, मात्र तोडगा निघत नाही. कारधा, सुरेवाडा, खमारी, करचखेडा ही गावे यामुळे अधिकच प्रभावित झाले आहेत. कारधा येथील घरांना कायमच धोका असतो. अशा परिस्थितीत या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, सुरबोडी गावाचे 2013 च्या कायद्यानुसार पुनर्वसन व्हावे, आदिवासींच्या जमिनी अधिग्रहित केल्याने ते भूमिहीन झाले असून त्यांना जमिनी परत द्याव्या, भूखंड मंजूर करण्यात यावे, तातडीने घरांची मोजमाप करून मोबदला देण्यात यावा यासह अनेक मागण्यांना घेऊन प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आंदोलन करीत असते.
 
 
6 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच मागण्यांना घेऊन प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. आज दुपारी आंदोलन करते महिला आक्रमक झाल्या. गीता खंगार, प्रमिला मेश्राम, पंचफुला मेश्राम या तीन महिला आंदोलन स्थळाच्या पुढे असलेल्या विशाल अशा विशाल अशा कडूलिंबाच्या झाडावर चढल्या. या मागण्यांना घेऊन स्वतः मुख्यमंत्री व्हिडिओ कॉल द्वारा बोलत नाहीत, तोपर्यंत झाडावरून न उतरण्याचा निर्णय महिलांनी घेतला. महिलांचा हा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली. पोलीस यंत्रणा सज्ज होऊन, अग्निशमन दलालाही आंदोलन स्थळी प्राचारण करण्यात आले. परंतु वृत्त लिहेस्तोर आंदोलक महिला झाडावरच होत्या. त्यामुळे प्रशासन चांगलेच गोत्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून आंदोलन स्थळीतआंदोलन स्थळीत स्वयंपाक करून हे आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते. परंतु आजचा पवित्रा प्रशासनाची धांदल उडवणारा होता.
 
 
आंदोलन स्थळी तहसीलदारांपासून अन्य अधिकारी उपस्थित होते. मात्र आंदोलन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र होते.
Powered By Sangraha 9.0