पंचपरिवर्तन सुत्राच्या आधारे समाजात अमुलाग्र बदल: रविंद्र भुसारी

07 Oct 2025 19:51:45
मंगरुळनाथ, 
Ravindra Bhusari : पाच परिवर्तन सूत्रांच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाला असून, सामाजिक समरसता,पर्यावरण,कुटुंब प्रबोधन,नागरी कर्तव्य,स्व-जागरण या पाच सुत्राच्या माध्यमातुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करित आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी यांनी मंगरुळनाथ येथील आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी व विजयादशमी उत्सव प्रसंगी केले.
 
 
 
jkl
 
 
 
येथील पंचायत समिती समोरील राठी मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक शाखा मंगरुळनाथ नगराचा विजयादशमी उत्सव कार्यक्रम ५ आटोंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सुबोध महल्ले यांची उपस्थिती होती तर तालुका संघचालक देवानंद राठोड, नगर संघचालक कीशोर घोडचर यांची प्रमुख उपस्थीती होती. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून संघाचे जेष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी नागपुर यांची प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थिती होती.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला १०० वर्षे झाल्याने मंगरुळनाथ नगरातुन श्री चारभूजानाथ मंदीर, सुभाष चौक, बिरबलनाथ महाराज मंदीर, महाराणा प्रतापसिंह मार्ग,वीर भगतसिंग चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रमुख मार्गाने राठी मैदानपर्यंत पथसंचलन काढण्यात आले. पथसंचलनाच्या रस्त्यात महीलांनी आपापल्या घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या व पथसंचलनावर फुलांचा वर्षाव केला व संघाप्रती प्रेम व्यक्त केले.कार्यक्रमाध्यक्ष डॉ.सुबोध महल्ले यांनी राष्ट्रीय स्वयंयसेवक संघा विषयी बोलतांना संघ कार्य हे ईश्वरी कार्य असून, प्रत्येक समाजाने याची जाणीव ठेवली पाहीजे संघ आज देशातच नव्हे तर संपुर्ण जगात संघाचे कार्य सुरु आहे.
 
 
प्रमुख वक्ते रविंद्र भुसारी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली असून, आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची सुरुवात केली. हिंदू समाजाचे संघटन हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल सुरू झाली. शंभर वर्षानंतर, डॉ. हेडगेवारांनी केलेल्या बीजारोपणातून एक डेरेदार वटवृक्ष निर्माण झाला आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजचे दृश्यस्वरूप आहे. संघ सुरु झाला तेव्हा काय परिस्थिती होती हे समजून घेतले पाहिजे. स्वयंस्फूर्तीने राष्ट्रसेवेचा विडा उचलणार्‍या व्यक्तीने केवळ राष्ट्रकार्यासाठी निर्मिलेली संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. समाजाच्या संघटित शक्तीच्या बळावर आपला देश विश्वगुरू होऊ शकतो. आपली जीवनमूल्ये, परंपरा आणि चिरंतन तत्त्वज्ञान यांच्या आधारे परमवैभवी होऊ शकतो असे ही सांगितले.
 
 
सामाजिक समरसता गतिविधी हा महत्त्वाचा विषय संघाने आपला कार्यसूचीवर घेतला आहे. सामाजिक समरसता हा विषय संघाला नवा नाही. अगदी संघाच्या प्रारंभापासून समरसता हा कृतीचा व चिंतनाचा विषय संघात आहे. आपली संतपरंपरा, महापुरुषांच्या प्रबोधनाचा आधार घेऊन समाजात बदल घडवून आणण्यासाठी संघ प्रयत्न करत असला तरी भावजागरणातून मानवी व्यवहारात बदल घडवून आणण्यावर भर दिला जातो आहे. या प्रयत्नांना यश लाभत आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अस्पृश्यता पाळल्या जातात. त्या सामाजिक जीवनावर वाईट प्रभाव निर्माण करून समाजाचे विभाजन करतात. या पार्श्वभूमीवर बंधुभाव हाच धर्म ही संकल्पना समोर ठेवून सामाजिक समरसता या विषयातून समाजमन घडवण्यात येते आहे. सामाजिक दरी कमी करण्यासाठी या गतिविधीचा उपयोग होत असून त्यातून समरस समाज उभा राहत आहे.
 
 
नागरी कर्तव्य - आपण स्वतंत्र देशात राहतो. आपल्या देशाचे संचालन संविधानाच्या माध्यमातून होत असते. भारतीय संविधान हा भारतीय नागरिकांनी स्वतःप्रती अर्पण केलेला जिवंत दस्तऐवज आहे. आपल्या संविधानाने आपल्यासाठी काही कर्तव्ये आणि काही हक्क दिले आहेत. त्या विषयी खूप मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे हक्कांच्याबाबतीत लवकर जागरूकता निर्माण होते आणि हक्कासाठी सर्वजण आग्रही देखील असतात. संविधानाने आपल्याला काही जबाबदार्या दिल्या आहेत, त्याला आपण नागरी कर्तव्य असेही म्हणू शकतो. हा विषय समाजाच्या आचरणाचा असून तो समाजानेच कृतीतून साकार करायचा आहे. यासाठी लागणारे प्रबोधन व दिशादर्शन संघकार्यकर्ते करत आहेत.
 
 
‘स्व’ जागरण. नव्याचा स्वीकार करताना जास्तीत जास्त स्वदेशी तंत्रज्ञान, उत्पादन याचा वापर, स्वभाषेचा वापर म्हणजे ‘स्व’ जागरण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून आपल्या मुळाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ‘स्व’ जागरण. हे सर्व कशासाठी? आपण व आपल्या भविष्यासाठी. आपल्या सण-उत्सवातून जे एकत्व प्रकट होते, त्याच्या रक्षणासाठी. आपल्या परंपरा, आपले ज्ञान कौशल्य याचे संवर्धन करण्यासाठी.संस्कार, संस्कृती आणि राष्ट्रीयता यांना जपण्यासाठी ‘स्व’ जागरण आवश्यक आहे.या कामी स्वयंसेवक पुढाकार घेऊन आदर्श निर्माण करत आहेत या ईश्वरीय कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भुसारी यांनी केले.
 
 
साघीक गीत सुधाकर क्षीरसागर, वैयक्तिक गीत ऋषिकेश महाजन यांनी म्हटले. सुभाषित व अमृत वचन म्हटले. यावेळी आ.श्याम खोडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी नगर कार्यवाह महादेव निंबेकर, सह कार्यवाह जयेश रघूवंशी, श्रेयस भालेराव संजीव टोंचर,मुकुंद दंडे,सुधीर घोडचर,जिगर ठाकरे,तेजस कांत,विश्वजय सावळकर यांचे सह संघ कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0