आर्वी,
swadeshi-arvi : प्रत्येकांनी स्वदेशी उत्पादनेच खरेदी करावी, दुकानदारांनी दुकानावर स्वदेशीचा बोर्ड लावावा तसेच स्वदेशी वस्तू जीवनाचा भाग व्हावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला आर्वी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात स्वदेशी वस्तूंचा वापर करताना दिसत आहे.
स्वदेशी म्हणजे आपल्या देशात उत्पादित वस्तू, त्याचा वापर, पद्धत ही नागरिक, समाज व देशहिताचे असायला पाहिजे. आपल्या देशाची संस्कृती, जीवनशैली ही फार जुनी असून स्वदेशीच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्यास सहाय्यभूत ठरते. स्वदेशीमुळे युवकांना रोजगार मिळून स्वावलंबी बनवतील आणि त्यातूनच गरिबी दूर होऊन अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. आर्वी येथील स्वदेशी मंचचे सुनील पारसे यांनी स्वदेशी वस्तूबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने आपल्या दुकानात स्वदेशी उत्पादित वस्तू विक्रीसाठी ठेवल्या असून वेगवेगळ्या पद्धतीने स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी’चा नारा देत स्वदेशीचा लोगो असलेल्या पिशव्यांचे वाटप पारसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वदेशी मंचचे सुनील पारसे, प्रवीण सरोदे, स्वदेशी जागरणचे तालुका संयोजक अभय हळवे, अभय घोटकर, मनोज सिराने, जयमाला मानकर, राणी कोहळे, पद्मा आहूजा, घनश्याम घोटकर, अविनाश अंगायितकर, सतीश लोखंडे यांच्यासह अनेक लोकांनी स्वदेशीचा पुरस्कार करून प्रत्येकाने स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प करून खरेदी केली.