गोंदिया,
tatanagar-itwari-tatanagar-cancelled : भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे विभागाद्वारे चक्रधरपूर मंडळात येणार्या महिन्यांत विविध ठिकाणी रेल्वे टॅ्रकचे नविनिकरण करण्यात येणार असल्याने इतवारी रेल्वे स्थानकावरून सुटणारी टाटानगर-इतवारी-टाटानगर ३० दिवस रद्द राहणार आहे.

रेल्वेच्या विविध विभागांत विकासात्मक कार्य प्रगतिपथावर आहेत. रेल्वे लाईन व नविनीकरणाची कामे सुरळीत सुरू राहावित म्हणून विविध विभागांत निर्धारीत तारखांना मेगा ब्लॉक केले जाणार आहे. यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यांच्या निर्धात तारखांना काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. यात डाऊन लाईन कांसबहाल-राहूलकेला दर शनिवारी म्हणजेच ११, १८, २५ ऑक्टोबर, १, ८, १५, २२, २९ नोव्हेंबर आणि ६, १३ डिसेंबर रोजी तर अप लाईन राउरकेला-कांसबहाल दरम्यान दर मंगळवारी म्हणजेच १४, २१, २८ ऑक्टोबर तसेच ४, ११, १८, २५ नोव्हेंबर आणि २, ९, १६ डिसेंबर रोजी आणि संयुक्त लाईन बडा मुंडा ए केबिन-राउरकेला दरम्यान दर शनिवारी म्हणजेच २०, २७ डिसेंबर आणि ३, १०, १७ जानेवारी २०२६ आणि अप लाईन बडा मुंडा ए केबिन-राउरकेला दरम्यान दर मंगळवारी २३, ३० डिसेंबर रोजी आणि ६, १३, २० जानेवारी २०२६ रोजी ट्रॅक नूतनीकरणाचे काम केले जाईल. यामुळे ट्रेन क्रमांक १८१०९/१८११० टाटानगर-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस ११, १४, १८, २१, २५, २८ ऑक्टोबर तसेच १, ४, ८, ११, १५, १८, २२, २५, २९, नोव्हेंबर रोजी रद्द राहील. २, ६, ९, १३, १६ डिसेबर तसेच २०, २३, २७, ३० डिसेंबर आणि ३, ६, १०, १३, १७, २० जानेवारी या तारखांना टाटानगर-इतवारी- टाटानगर गाडी रद्द राहणार आहे.
प्रवासी सामान्यतः सणासुदीच्या काळात घरी परतण्यासाठी किंवा कुटुंबासह सुट्टीसाठी जाण्यासाठी तीन ते चार महिने आधीच रेल्वे तिकिटे बूक करून आरक्षण करतात. मात्र वेळेवर कन्फर्म तिकिटे मिळणे कठीण झाले आहे. गोंदियाहून इतर महत्त्वाच्या शहरांसांठी फक्त वेटिंग तिकीटे उपलब्ध आहेत. तिकीटे बुक करताना कन्फर्म स्लीपर तिकिटे उपलब्ध नसतात, एसी क्लास तिकिटे तर सोडाच. गोंदियामध्ये मुंबई आणि पुण्याला जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या मार्गावर तिकिटांना वर्षभर अधिक मागणी असते. तथापि, दिवाळी सण काही दिवसांवर असताना कन्फर्म रेल्वे तिकिटे मिळणे कठीण झाले आहे.
गोंदिया-रायपूर लोकल ट्रेन सुरू करा
गोंदिया-गोंदिया आणि रायपूर दरम्यान ०८७२४-०८७२३ क्रमांकाची मेमू लोकल ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. ही ट्रेन सकाळी ७ वाजता गोंदियाहून सुटत असे, ११.२० वाजता रायपूरला पोहोचत असे, संध्याकाळी ७ वाजता रायपूरहून सुटत असे आणि रात्री ११.१५ वाजता गोंदियाला पोहचायची. गेल्या काही वर्षांपासून ही ट्रेन बंद आहे. विशेषतः दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, व्यवसायीक, कामगार यांच्यासाठी ही गाडी सोयीची आहे. ही ट्रेन बंद असल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. वंदेभारत सारख्या आधुनिक गाड्या सुरू असल्या तरी आणि काही प्रवाशांना त्यांचा फायदा होत असला तरी, लोकल ट्रेनने प्रवास करणे सामान्यांसाठी अधिक सोयीस्कर आहे. करीता गोंदिया-रायपूर लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी होत आहे.