सिरोंचात ‘पुष्पा’ शैलीत सागवान तस्करीचा पर्दाफाश

07 Oct 2025 18:12:20
सिरोंचा,
teak smuggling अल्लू अर्जुनच्या लोकप्रिय ‘पुष्पा’ चित्रपटात दाखविलेल्या चंदन तस्करीप्रमाणेच आता गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सागवान तस्करीचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. नुकतेच 1 ऑक्टोबरच्या रात्री चिंतलपल्ली परिसरात वन विभागाने एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले. या वाहनात लोखंडी पत्र्यांचे गुप्त कप्पे तयार करून सागवानाचे मौल्यवान लाकूड लपवण्यात आले होते. पूर्वी नदीमार्गे किंवा नावेमधून सागवानाची तस्करी होत होती. परंतु आता अत्याधुनिक पद्धतीने गाड्यांच्या डब्यांमध्ये लाकूड लपवून वाहतूक केली जात असल्याची बाब समोर आली आहे.
 
 

smuggling  
 
 
सिरोंचा वनविभागात सिरोंचा, असरअली, देचली, बामनी, जिमलागट्टा, झिंगनूर, कमलापूर आणि प्राणहिता असे एकूण आठ वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत. मुख्यालयात अधिकारी असूनही दुर्गम क्षेत्रात कर्मचारी नसल्याने तस्कर मोकाट फिरत आहेत. परिणामी, या भागात ‘पुष्पा’ शैलीतील सागवान तस्करीचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून सागवान तस्करीच्या घटना अधूनमधून उघड होत आहेत. मात्र, काही कर्मचार्‍यांचा तस्करांशी संगनमत असल्याची चर्चा थांबलेली नाही. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात सागवानाचे अवैध जाळे बळावत असून वन विभागाच्या नाक्यावरूनच हे सागवान गाड्यांमधून वाहून नेले जात असल्याचा आरोप होत आहे.teak smuggling विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक जनप्रतिनिधी लवकरच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वनमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार आहेत.
यासंदर्भात वनपाल नीलम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या कारवाईची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांकडे आहे. आम्ही थोड्याच वेळात सर्व प्रश्‍न स्पष्ट करून पत्रकार परिषदेद्वारे माहिती देऊ, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0