नागपूरमध्ये विषारी कफ सिरपमुळे १८ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

07 Oct 2025 10:12:19
नागपूर,
toxic cough syrup in Nagpur नागपूरमध्ये विषारी कफ सिरपमुळे १८ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धानी डेहरिया नावाच्या या चिमुकलीचा नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील धानी गंभीर स्थितीत उपचारासाठी नागपुरात दाखल करण्यात आली होती. तिच्या किडनीच्या कार्यात बिघाड आणि मेंदूमध्ये सूज निर्माण झाल्याने तिला रुग्णालयात उपचार सुरू होते. धानीच्या मृत्यूनंतर या विषारी कफ सिरपामुळे नागपुरातील मृत्यूची संख्या एकूण दहा झाली आहे.
 
 
toxic cough syrup in Nagpur
 
कफ सिरपमुळे बाळांच्या मृत्यूनंतर प्रशासन आणि आरोग्य अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे (DMER) पथक शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचले असून, बालरोग विभाग प्रमुख आणि न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ यांच्यासह रुग्णांची स्थिती, उपचारांची माहिती आणि मेडिकल इतिहास तपासण्यात आला आहे. त्याचबरोबर, ‘एम्स नागपूर’च्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकाने छिंदवाडा जिल्ह्यातील परासीया तालुक्याचा दौरा केला, जिथे या सिरपमुळे सर्वाधिक बाळ प्रभावित झाले आहेत. तीन दिवसांत केंद्रीय पथक आपला अहवाल केंद्राला सादर करणार आहे.
 
विषारी कफ सिरपात मुख्य घटक डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड सिरप आहे, जे १९५० च्या दशकात कोडेनला पर्याय म्हणून विकसित करण्यात आले. हे सिरप कोरड्या खोकल्यावर आराम देण्यासाठी वापरले जाते आणि मेंदूपर्यंत खोकल्याचे संदेश पोहोचण्यापासून थांबवते. औषध केमिकल प्रोसेसिंगद्वारे तयार केले जाते आणि लहान मुलांसाठी प्यायला सोपं असल्यामुळे सिरपच्या स्वरूपात दिले जाते. विशेष म्हणजे, जर मुलांना किंवा रुग्णांना यापूर्वी लिव्हर, किडनी किंवा इतर गंभीर आजार असतील, तर हे औषध देण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. पालकांनी बाजारात सहज मिळणारे सिरप मुलांना देण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि डॉक्टरांचा सल्ला निश्चित करणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0