जळगाव,
Ajit Pawar group leader arrested राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अर्बन सेलचे राज्यसंघटक विनोद देशमुख यांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे जळगावमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, व्यवसायिक मनोज वाणी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्याविरोधात आधीच गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचबरोबर, रामदास कॉलनीतील व्यवसायिक कार्यालयावर हल्ला करून दरोडा तसेच जीव मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणीही त्यांच्याविरोधात कारवाई झाली होती.
यापूर्वी रामानंदनगर पोलीस यांनी त्यांना अटक केली होती, त्यानंतर न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. यानंतर जळगाव शहर पोलिसांनी देखील विनोद देशमुख यांना अटक केली. या प्रकरणात तब्बल तीन वर्षांनंतर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच मनोज वाणी यांनी पत्रकार परिषदेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानुसार, विनोद देशमुख हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर त्वरित कारवाई करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.
मनोज वाणी यांनी या प्रकरणाचे तपशील पत्रकारां समोर मांडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता विनोद देशमुख यांची अटक झाल्यामुळे या प्रकरणावरून राजकीय चर्चेला नवा वळण मिळाले आहे. जळगाव शहर पोलिस आणि न्यायालयीन यंत्रणा या प्रकरणात तंतोतंत कारवाई करत असल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते.