आमगाव,
Amgaon Nagar Parishad, आमगाव नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात येणार्या कुंभारटोली परिसरात मुलभूत सुविधांअभावी शेकडो संतप्त महिलांनी आज, ८ ऑक्टोबर रोजी नगर परिषद कार्यालयासमोर आक्रोष व्यक्त केला. दरम्यान, मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
आमगाव नगर परिषदेत कुंभारटोली ग्रामपंचायतीला समाविष्ठ करण्यात आले. परंतु नगर परिषदेचे कुंभारटोली परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. कुंभारटोली येथे घरकुलांची समस्या, पट्ट्यांचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांमधील अस्वच्छता, वारंवार खंडित होणारा पाणीपुरवठा, पथदिव्यांचा अभाव अशा अनेक मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्या व अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात अनेकदा नगरपरिषद प्रशासनाला मागणी, तक्रारी, निवेदन देण्यात आले. परंतु प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. परिणामी आज, ८ ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या राणी काळसर्पे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून मोठ्या संख्येने महिला व नागरिक नगरपरिषद कार्यालयासमोर गोळा होत रस्ता द्या, पाणी द्या, घरकूल द्या, स्वच्छता द्या, न्याय द्या तसेच एक नारी सबसे भारी अशा घोषणा देत आक्रोष व्यक्त केला. प्रसंगी महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तक्रारी व मागण्याचे निवेदन नगरपरिषद प्रशासनाला सादर केले. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने येत्या काही दिवसांत रस्ते दुरुस्ती व नाल्या स्वच्छतेचे काम सुरू करून अन्य समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.