वर्धा,
Nanavat gang arrested, पुलगाव येथील चामुंडा ज्वेलर्स या सराफा दुकानाला टार्गेट करीत १२ लाख ७६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना २० जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी पुलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल तीन महिने समांतर तपास करून पुणे येथील आंतरराज्य नानावत गँगला अटक करून २९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चामुंडा ज्वेलर्स फोडल्यानंतर या प्रकरणाचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने केला. पोलिस अधीक्षक जैन यांनी गुन्हे शाखेचे चार पथके तयार केली. घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजमध्ये टोळीतील सदस्यांनी तोंडाला कापडाने बांधून आपली ओळख लपविली होती. तसेच या चोरट्यांनी हातात गुल्हेर बाळगून स्पोर्ट बाईकद्बारे प्रवास करीत असल्याचेही दिसून आले. पथकाने राज्यातील सक्रिय गुन्हेगारांची माहिती घेतली असता अशाप्रकारे गुन्हे करणारी ही पुणे येथील टोळी असल्याचे पुढे आले. गुन्हे शाखेचे पथक रांजनगाव येथे धडकले. नानावत गँगच्या सदस्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली. चोरीचा गुन्हा हा पुणे जिल्ह्यातील नानावत गँगने केल्याची तांत्रिक माहिती प्राप्त झाली. टोळीतील विकी उर्फ यामी राठोड (२८) रा. फंडवस्ती बाभुळसरा (खुर्द) रांजनगाव जि. पुणे याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. शोध घेत असताना विकी राठोड हा पिंपरी चिंचवळ हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्याला मोठ्या शिताफीने अटक करून चौकशी केली असता त्याने वामन राठोड, राहुल उर्फ काळ्या राठोड दोन्ही रा. फंडवस्ती बाभुळसरा, रांजनगाव ता. शिरूळ जि. पुणे व इतर साथीदारांसह केल्याचे सांगितले. पथकाने वामन राठोड याला ताब्यात घेऊन सोन्या-चांदीच्या दागिन्याबाबत विचारपूस केली असता टोळीतील आशा ठकर (४२) रा. अहमदाबाद व सोमपाल नारायणसिंग (३१) रा. हरवत ता. आसपूर जि. डुंगरपूर, राजस्थान यांना विक्री केल्याचे सांगितले.
गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदाबाद गाठून सतत ९ दिवस शोध घेऊन करजान जि. बडोदरा राज्य गुजरात येथे सापळा रचून सदर महिला व तिच्या साथीदाराला ताब्यात घेतले. दागिने आम्हीच खरेदी केल्याचे सांगितल्याने त्यांच्याकडून दोन चांदीच्या ८ किलोच्या विट, एक सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार, तीन मोबाईल संच असा २९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, पोलिस उपनिरीक्षक राहुल ईटेकर, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, शेखर डोंगरे, आदींनी केली