गोंदिया पोलिस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल

08 Oct 2025 19:26:56
गोंदिया,
Gondia police जिल्ह्यातील गुन्हे तपास यंत्रणेला तांत्रिक बळकटी देण्यासाठी तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध गुन्ह्यांवर अंकूश घालण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस दलात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे.
 
 

mobile forensic van, Gondia police, forensic investigation, 
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक, न्याय वैद्यकीय पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक भाग म्हणून राज्य शासनाच्या धोरणानुसार महासंचालकांतर्फे (न्याय व तांत्रिक) जिल्हा पोलिस दलाला प्राप्त झालेली ही फॉरेन्सिक व्हॅन गुन्ह्यांचा उलगडा करण्यामध्ये न्याय वैद्यकीय सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते या व्हॅनचे अनावरण करण्यात आले. लवकरच जिल्ह्यातील चारही उपविभागासाठी ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अत्याधुनिक व्हॅनमुळे गुन्हे तपासणी अधिक जलद, अचूक आणि प्रभावी होणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक फॉरेन्सिक उपकरणे बसविण्यात आली असून, गुन्ह्याच्या ठिकाणीच प्राथमिक पुरावे संकलित करणे, विश्लेषण करणे आणि त्वरित अहवाल तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत वेळेची बचत होऊन वैज्ञानिक तपासात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता येणार आहे. तसेच ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन अप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामध्ये डिजिटल फॉरेन्सिक, डीएनए सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि क्राईम सीन मॅपिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. विशेषतः सायबर गुन्हे, खून, अपघात आणि अन्य गंभीर गुन्यांच्या तपासात ही व्हॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
फॉरेन्सिक विज्ञानाचा वापर करून तपास यंत्रणा अधिक मजबूत आणि पारदर्शक बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून तपास कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. तसेच गुन्ह्यांचा उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.
- गोरख भामरे
जिल्हा पोलिस अधीक्षक, गोंदिया
Powered By Sangraha 9.0