नव्या कुलगुरूंच्या शोधाची अंतिम फेरी

08 Oct 2025 14:23:01
नागपूर,
Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नव्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात सुमारे ३० उमेदवारांनी मुलाखती दिल्यानंतर निवड समिती पाच प्रमुख उमेदवारांची नावे ठरवणार व त्यानंतर ही नावे बंद लिफाफ्यात राज्यपाल कार्यालयात पाठवली जातील. राज्यपाल स्वतः या पाच उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम नाव निश्चित करतील.
 
Nagpur University
 
नागपूर विद्यापीठातील नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात
या महिन्याच्या अखेरीस नवीन कुलगुरूंची घोषणा होण्याची शक्यता दर्शविली जात आहे. विद्यापीठात गेल्या दीड वर्षांपासून नियमित कुलगुरू नाहीत. सुरुवातीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या नंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोड़े-चवरे यांनी पदभार स्वीकारला. मात्र प्रशासकीय कामकाजाच्या व्यस्ततेमुळे विद्यापीठातील निर्णय प्रक्रिया आणि विकासकामांवर मर्यादा आल्या. सध्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार शैक्षणिक कामकाज पाहत आहेत, पण धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नव्या कुलगुरूंच्या आगमनानंतरच विद्यापीठाचे कामकाज नियमित गतीने सुरू होण्याची अपेक्षा आहे.
 
 
निर्णयाकडे संपूर्ण विद्यापीठाचे लक्ष
यंदाच्या नियुक्तीत एका विशिष्ट शिक्षण मंच आणि संघटनेतील गटांमध्ये तीव्र स्पर्धा असल्याची चर्चा आहे. विद्यापीठात लवकरच ६९ प्राध्यापकांची भरती होणार असल्याने, आगामी निर्णय प्रक्रियेवर परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानंतर चारही संकुलांच्या अधिष्ठात्यांची आणि प्र-उपकुलगुरूची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण विद्यापीठाचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0