मुंबई,
Rains to stay in Maharashtra for a long time यंदाचा पावसाळा जणू संपायचे नाव घेत नाही. साधारण मे महिन्याच्या अखेरीपासून सुरू झालेला पाऊस दसरा-दीवाळीपर्यंत कायम राहिला असून, आता नव्या हवामान अंदाजानुसार तो डिसेंबरपर्यंत मुक्कामी राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत पावसाचा प्रभाव वर्षाअखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी, म्हणजेच २४ मे रोजीच दाखल झाला. सामान्यतः तो १ जूनला येतो. या मान्सून हंगामात राज्यात ७.९ टक्क्यांनी जास्त पाऊस झाला. सप्टेंबरनंतरही अनेक भागांमध्ये पावसाचे सरी दिसत राहिल्या आणि आता हवामान तज्ज्ञ सांगत आहेत की, हा ‘परतीचा पाऊस’ लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये अजूनही ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. “हिवाळा गेला का?” कारण ऑक्टोबरच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी थंड वाऱ्याची चाहूल लागायची, तिथे आजही दमट आणि उकाड्याचे वातावरण आहे. केंद्रीय हवामान विभागाच्या मते, यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांदरम्यान देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. त्यातही महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम अधिक काळ टिकण्याची चिन्हे आहेत.
या अनियमित पावसामुळे शेती, वाहतूक आणि बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानातील या बदलामागे ‘ला नीना’ नावाची हवामान प्रणाली कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पॅसिफिक महासागरात निर्माण होणारी ही प्रणाली सामान्यतः भारतीय मान्सूनला पोषक ठरते. परंतु, या वर्षी ती विलंबाने सक्रिय झाल्याने तिचा परिणाम मान्सूनच्या कालावधीनंतरही दिसत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘ला नीना’ स्थिती विकसित होण्याची शक्यता तब्बल ७१ टक्के आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांतही देशाच्या विविध भागांत पावसाचे प्रमाण वाढू शकते.
या सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उन्हाळ्यातल्या उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी आता हिवाळ्याच्या चाहुलीऐवजी पावसाची सरीच कायम राहणार असल्याने अनेकांना या ‘दीर्घ पावसाळ्याचा’ त्रास होऊ लागला आहे. पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्याचे स्वागत करण्याऐवजी आता महाराष्ट्र पुन्हा पावसाच्या छत्राखाली जाणार आहे, हे निश्चित झालं आहे. पावसाचं हे लांबलेलं आगमन आणि हिवाळ्याचे हरवलेले अस्तित्व हवामानातील बदल किती खोलवर पोहोचले आहेत याचीच ही जाणीव करून देत आहे.