शिल्पा शेट्टी यांची मुंबई पोलिसांकडून ५ तास कसून चौकशी

08 Oct 2025 13:07:38
मुंबई ,
Shilpa Shetty बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी कारण आहे एक मोठे आर्थिक फसवणूक प्रकरण, ज्यामुळे तिच्यावर गंभीर आरोप झाले असून, पोलिसांकडून ती कसून चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शिल्पा शेट्टीची तब्बल पाच तास चौकशी केली असून, या प्रकरणामुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 

Shilpa Shetty  
ही कारवाई लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली. कोठारी यांनी आरोप केला आहे की, शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी त्यांच्या कंपनीकडून ६० कोटी रुपयांची फसवणूककेली आहे.
 
 
 
या तक्रारीनुसार, २०१५ साली शिल्पा शेट्टी यांनी ७५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. मात्र त्यानंतर, त्यांनी ही रक्कम कर्जाऐवजी "गुंतवणूक" म्हणून स्वीकारावी, अशी सूचना दिली. यावर सहमती दर्शवत, दीपक कोठारींनी एप्रिल २०१५ मध्ये ३१.९५ कोटी आणि सप्टेंबर २०१५ मध्ये २८.५३ कोटी रुपये, अशा दोन टप्प्यांमध्ये एकूण ६० कोटी रुपयांची रक्कम दिली.कोठारी यांचा आरोप आहे की, ही रक्कम व्यवसायासाठी वापरली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात, ती रक्कम शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी वैयक्तिक खर्चासाठी वापरली. इतकेच नव्हे तर, पैसे परत मागूनही ते मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.
 
 
 
या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२५ मध्येच आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात लूकआउट सर्क्युलर जारी केले होते, जेणेकरून ते देशाबाहेर जाऊ न शकतील.दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप खोटे, निराधार आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले, “आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि तपास यंत्रणेसमोर सत्य मांडण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करू.”शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या जोडीसाठी ही काही पहिली वादग्रस्त घटना नाही. यापूर्वीही राज कुंद्रा अनेक वादांमध्ये अडकला होता. मात्र आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीचं करिअर आणि प्रतिमा धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0