bhakti yoga श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा अध्याय भक्तियोग आहे. आतापर्यंत भगवंताने अर्जुनाला आपल्या निर्गुण निराकार रूपाच्या सगुण साकार स्वरूपाचे ज्ञान दिले. सविशेष, सोपाधिक प्रतिमा स्वरूपाचे माहात्म्य सांगितले. आपले अरूपाचे रूप विशद केले. विभूति योगाच्या माध्यमातून परमेश्वराने आपले विश्वरूप दर्शनही अर्जुनाला करविले. परमात्म स्वरूप प्राप्तीसाठी भगवंतांनी अनन्यभाव सांगितला. त्यासाठी अर्जुनाला प्रथम भक्त होऊन उपासनेचा मार्ग सांगितला. त्यानिमित्ताने सर्व साधकांना भक्तीचे महत्त्वही सांगितले.
जो हा अर्जुना साद्यन्त ।
सांगितला प्रस्तुत ।।
तो हा भक्तियोगू समस्त ।
योगामाजी ।। ज्ञानेश्वरी ।।
भगवंतांनी सर्वयोगांमध्ये सर्वश्रेष्ठ असा भक्तियोग या अध्यायात विशद केला आहे. त्यावर अर्जुनासमोर एक शंका उपस्थित आली. त्याच्या या शंकेनेच भक्तियोग प्रारंभ झाला.
अर्जुन उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तंतेषां के योगवित्तमा:।।
काही भक्त सगुण भक्ती करतात, तर काही निर्गुण भक्ती करतात. या दोन्ही उपासनेत श्रेष्ठ योगी कोण? या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने या महत्त्वाच्या प्रश्नाने केली. या प्रश्नाचे उत्तर देखील भगवंताने तितक्याच स्पष्टपणे दिले.
श्रीभगवान उवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मता: ।।
भगवंत म्हणतात, जे भक्त सगुण भक्ती करतात ते भक् सर्वश्रेष्ठ आहेत. याचा अर्थ निर्गुण भक्ती न्यून असाही होत नाही.
निर्गुण उपासक देखील आपल्या इंद्रियांवर ताबा आणी सर्वत्र समभाव ठेवून माझ्या सच्चिदानंद स्वरूपाची निर्गुण उपासना करतात ते परमात्म स्वरूपालाच प्राप्त होतात. पण...
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्।
अव्यक्ता हि गतिर्दु:खं देहवद्भिरवाप्यते ।।
निर्गुण उपासनेत क्लेश म्हणजे कष्ट आहेत. म्हणून सामान्य लोकांना सगुण भक्तीच उत्तम.
नातुडे मुख्य परमात्मा, म्हणोनी करावी लागे प्रतिमा! हेच सत्य आहे. जे सगुण उपासना करतात त्यांनी मात्र आपली सर्व कर्मे भगवंताला अनन्यभावाने अर्पण करून उपासना करावी.
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ।।
अशा भक्तांचा मृत्युसंसारसागरातून भगवंत उद्धार करतात.
म्हणून हे पार्था! तू तुझे मन, बुद्धी निश्चल होऊन माझ्यातच स्थिर ठेव. त्यामुळे तू नि:संशय माझ्यातच स्थिर होशील. भगवंत आपल्या सामान्य जनांसाठी किती सवलती देतात ते पाहा!
ते अर्जुनाला म्हणतात की-
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ।।
जर समजा, तू तुझे मन निश्चल ठेवायला असमर्थ असशील तर घाबरू नको तर तू अभ्यास करून माझ्या प्राप्तीची इच्छा कर. जर समजा, तू अभ्यास करण्यासही असमर्थ ठरला तरीही काळजी करू नको.
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ।।
मग तू तुझी सर्व कर्मे माझ्यासाठी करण्यास प्रवृत्त हो. कारण मला अनुकूल कर्मेही तुला मोक्ष प्राप्तीसाठी उपयोगी ठरतील. मला अनुकूल कर्मे करण्यासही तू असमर्थ असशील तरीही चिंता करू नको.
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रित: ।
सर्वकर्मफलत्यागं तत: कुरु यतात्मवान् ।।
मग तू मनाला विवेकाने हाताळून संयमाने कर्म कर, पण कर्मफळाचा त्याग कर. जे जे तुला शक्य ते तू कर. त्यासाठी त्यांनी एकेक उपाय सांगितले. कर्मफळत्यागाचे महत्त्वही भगवंत मुद्दाम सांगतात. आपण पाहिले की भगवंतांनी सुरुवातीला अभ्यास सांगितला. भगवान पुढे सांगतात की-
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।
मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा माझ्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षा कर्मफळ त्याग श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्वरित शांती मिळते. भगवंत आता तर कोणता भक्त मला प्रिय आहे हे सांगतात. याहून सोपा आणि नवनीत मार्ग दुसरा नसेलच. म्हणजे जप तप अनुष्ठान करणे यापेक्षा आपण कसे वागलो म्हणजे आपण भगवंताचे प्रिय होऊ याचा विचार केला आहे.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र: करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुख: क्षमी ।।
सर्व भूतमात्रांच्यामध्ये द्वेष न करणारा, सर्वांप्रति मैत्र जीवाचे ठेवणारा, अहंकाररहित, सुखात आणि दु:खात समदृष्टी ठेवणारा, क्षमाशील असणारा भक्त मला प्रिय आहे. जो सदासर्वदा संतुष्ट, संयमित, दृढनिश्चयी तो भक्त मला प्रिय आहे. जो इतरांना त्रास देत नाही, जो इतरांमुळे उद्विग्न होत नाही. जो हर्ष, अमर्श, भीतीपासून मुक्त तो मला प्रिय आहे. अर्जुना! ज्याला कुठल्याही अपेक्षा नाहीत, जो सदैव शुद्ध, दक्ष आणि सर्व कर्मांचा परित्याग केलेला भक्त मला प्रिय आहे. जो हर्षोल्लासाने उन्मत्त होत नाही, जो कोणाचाही द्वेष करीत नाही. जो शोक करीत नाही आणि कामनाही करीत नाही. शुभाशुभाचा परित्याग करतो तो भक्त मला प्रिय आहे.
सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो: ।
शीतोष्णसुखदु:खेषु समः सङ्गविवर्जितः ।।
जो शत्रू-मित्र, मान आणि अपमान, थंड आणि उष्ण, सुख आणि दुःखात, निंदा आणि स्तुतीत समतोल राहतो. ज्याचे वाणीवर नियंत्रण आहे ,जो सतत संतुष्ट, ज्याची मती स्थिर असा बुद्धिमान भक्त मला प्रिय आहे.
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तंपर्युपासते ।
श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रिया: ।।
सार सांगू का अर्जुना! अरे, जे निरतिशय श्रद्धा आणि अनन्यभाव ठेवून मत्परायण होऊन धर्मानुसार वागतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. थोडक्यात, या अध्यायात आपण सामान्यांसाठी भगवंताने सगुण उपासनेचे महत्त्व विशद केले. याशिवाय भक्तीचा मार्ग सांगून, तुम्ही कसे वागले म्हणजे भगवंताचे प्रिय भक्त व्हाल हे सांगितले आहे.bhakti yoga त्यातही आपला उत्कर्ष होत जावा म्हणून आपण कसे वर्तन केले पाहिजे याचे सोप्या भाषेत वर्णन या अध्यायात आले आहे. अमृततत्त्वाकडे जाण्याचा राजमार्ग म्हणजे भक्तियोग आहे.
प्रा. दिलीप जोशी
9822262735