बरडशेवाळाची स्नेहा सोळंके पहिली महिला डॉक्टर
हदगाव,
गरीब परिस्थितीशी झुंज देत मेहनत, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीचे उदाहरण ठरलेली Sneha Solanke स्नेहा बालाजी सोळंके ही तालुक्यातील बरडशेवाळा येथील पहिली महिला डॉक्टर ठरली आहे. भाजीविक्रीतून उदरनिर्वाह करणार्या कुटुंबात जन्मलेल्या या मुलीने केवळ परिश्रमांच्या जोरावर यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. स्नेहाचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा बरडशेवाळा येथे झाले. शिक्षणात सातत्य ठेवत तिने नवोदय प्रवेश परीक्षेत यश मिळविले. दहावी परीक्षेत तब्बल ९६ टक्के गुण मिळवत शाळेत दुसरा क्रमांक पटकावला. बारावीनंतर नीट परीक्षेत पात्र ठरून नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली.
लहानपणीच डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणार्या Sneha Solanke स्नेहाने कष्टांची जाणीव ठेवत शिक्षणात कसोशीने मेहनत घेतली. घरच्या मर्यादित परिस्थितीतूनही तिने स्वप्न साकार केले. तिच्या या यशामुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण गावाचा अभिमान वाढला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत स्नेहाचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपवैदकीय अधीक्षक डॉ. मंगेश मस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Sneha Solanke दरम्यान, बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातही तिचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नांदेडच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजुषा मुरमुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे, डॉ. बरगे, जमादार अशोक दाडे, तलाठी बोरसुरे, ग्रामसेवक बेग, मुख्याध्यापक सोनटक्के, जिल्हा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक गणेश मस्के, आनंद मस्के, कार्यकर्त्या सविता निमडगे, प्रभाकर दहिभाते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलीचा सत्कार होताना आई-वडिलांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटले. गावातील अनेकांनी स्नेहाचे यश हे प्रेरणादायी ठरले असल्याचे सांगत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.