आता अंतराळातून पार्सल डिलिव्हरी!

08 Oct 2025 09:24:37
वॉशिंग्टन,
Space Delivery Vehicle जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुमचे पार्सल केवळ ६० मिनिटांत पोहोचू शकते आणि हे ऐकून तुम्हाला थोडे अविश्वसनीय वाटेल, पण आता हे वास्तवात येणार आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रात एका अमेरिकन कंपनीने क्रांती घडवून आणली असून, तिच्या नव्या तंत्रज्ञानामुळे पार्सल वितरणाची संकल्पनाच बदलणार आहे. ‘इन्व्हर्शन’ नावाच्या या एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान कंपनीने जगातील पहिले अंतराळ वितरण वाहन विकसित केले आहे. या अनोख्या वाहनाला ‘आर्क व्हेईकल' असे नाव देण्यात आले आहे. हे एक री-एंट्री व्हेईकल आहे. म्हणजेच ते पृथ्वीच्या वातावरणाबाहेर अवकाशात जाऊ शकते आणि नंतर सुरक्षितपणे पुन्हा वातावरणात प्रवेश करून जमिनीवर उतरते.
 
 
Space Delivery Vehicle
 
आर्क व्हेईकल एका वेळेस सुमारे २२७ किलोग्रॅमपर्यंत माल वाहून नेऊ शकते. वितरण प्रक्रियाही अत्यंत रोचक आहे. पार्सल आधी या वाहनावर लोड केले जाते, नंतर ते पृथ्वीपासून सुमारे १००० किलोमीटर उंचीवर अवकाशात झेपावते. त्यानंतर ते थेट वितरण बिंदूवर पोहोचते आणि पॅराशूटच्या मदतीने वातावरणात पुन्हा प्रवेश करून सुरक्षितपणे जमिनीवर उतरते. सर्वात उल्लेखनीय म्हणजे या वाहनाचा वेग-ताशी तब्बल २५,००० किलोमीटर! या वेगामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी एका तासात पार्सल पोहोचवणे शक्य होते.
 
 
या तंत्रज्ञानाचा वापर केवळ व्यावसायिक वितरणासाठीच नाही, तर युद्धकाळात किंवा आपत्कालीन परिस्थितीतही अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. कंपनीच्या मते, आर्क व्हेईकल अवकाशात ५ वर्षांपर्यंत सक्रिय राहू शकते, ज्यामुळे तातडीच्या मिशनसाठी त्याचा वापर सुलभ होईल. या वाहनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पुन्हा वापरता येण्याजोगे आहे. त्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि वारंवार उड्डाणे घेणे शक्य होते. जरी कंपनीने या अद्वितीय सेवेची किंमत किंवा लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली, तरी एवढे निश्चित आहे की या तंत्रज्ञानामुळे जागतिक लॉजिस्टिक्स जगतात अभूतपूर्व परिवर्तन घडणार आहे आणि ‘एक तासात जगभर डिलिव्हरी’ ही कल्पना आता विज्ञानकथेतून वास्तवात उतरणार आहे.
Powered By Sangraha 9.0