वर्धा,
woman assault वादानंतर दारू विक्रेत्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने एका महिलेला मारहाण करून तिची गावातून धिंड काढली. सावंगी मेघे पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या आमला येथे सोमवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी पुरुष आणि महिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसर्याबाजूकडूनही प्राप्त तक्रारीवरूनही गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
आमला येथील दारू विक्रेत्याचा त्याच परिसरातील महिलेशी वाद झाला. परिस्थिती इतकी बिकट झाली की दारू विक्रेत्याने तिला मारहाण केली. त्यानंतर चार महिला आणि तीन पुरुषांनी महिलेला पकडून तिची गावातून धिंड काढली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण झाले होते. पीडितेने प्रथम दुसर्या महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोपही आहे. संतप्त दारू विक्रेत्याने आणि इतरांनी नंतर तिला मारहाण केली. शिवाय तिला गावातून फिरवले. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांची चमू गावात पोहोचली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून चार महिला आणि तीन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिला आरोपींना नोटीस बजावल्यानंतर सोडण्यात आले. तर तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आले. याच प्रकरणातील एका महिला आरोपीच्या तक्रारीवरून पीडितेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.