मुंबई,
Bollywood नवीन वर्ष २०२६ चित्रपटप्रेमींसाठी धमाकेदार ठरणार आहे. जानेवारी महिन्यात बॉलिवूडपासून ते दक्षिणेच्या सिनेसृष्टीपर्यंत अनेक मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून, बॉक्स ऑफिसवर मोठा गजर होण्याची शक्यता आहे. प्रभास, सनी देओल, कार्तिक आर्यन, विजय थलापती, चिरंजीवी यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या प्रमुख भूमिका असलेले चित्रपट एका पाठोपाठ एक थिएटर्समध्ये झळकणार आहेत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ३१ डिसेंबर २०२५ रोजी कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांची जोडी असलेला ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ हा रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. समीर संजय विद्वंस दिग्दर्शित या चित्रपटाला तरुण प्रेक्षकांमध्ये मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.यानंतर, ९ जानेवारी २०२६ हा दिवस विशेष ठरणार आहे, कारण याच दिवशी तीन मोठ्या चित्रपटांचा एकत्र प्रदर्शित होणार आहेत. प्रभासच्या ‘द राजा साब’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. अनेकदा पुढे ढकलल्यानंतर अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.त्याच दिवशी तामिळ सुपरस्टार विजय थलापतीचा पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर ‘जन नायगन’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि बॉबी देओल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असून, तो दक्षिण भारतात मोठा गजर निर्माण करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
१० जानेवारी रोजी साऊथ इंडस्ट्रीतील आणखी एक दिग्गज चेहरा चिरंजीवी ‘मन शंकर वर प्रसाद गारू’ या कौटुंबिक अॅक्शन एंटरटेनरद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. अनिल रविपुडी दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत असणार आहे.१४ जानेवारी रोजी ‘पाराशक्ति’ या पॉलिटिकल पीरियड ड्रामा चित्रपटाचं प्रदर्शन होईल. सुधा कोंगारा दिग्दर्शित आणि शिवकार्तिकेय, श्रीलीला व रवि मोहन यांच्या भूमिका असलेला हा चित्रपटही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणारा सशक्त सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.या आधीपासूनच चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकांना खास वाटणाऱ्या चित्रपटांमध्ये सनी देओलची ‘बॉर्डर २’ विशेष आहे. १९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ या देशभक्तिपर चित्रपटाचा हा सीक्वेल असून, २२ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तो प्रदर्शित होईल. या चित्रपटात सनीसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत.जानेवारी २०२६ च्या या सिनेमॅटिक पर्वात प्रेक्षकांना प्रेम, अॅक्शन, राजकारण, इतिहास आणि देशभक्ती यांचा भरपूर मिलाफ पाहायला मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण निश्चितच, या नववर्षात चित्रपटगृहांमध्ये गर्दी उसळणार, यात शंका नाही.