कारंजा लाड,
pradeep bapat २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात हिंदु पुरुषांना लक्ष करून निर्दयतेने मारण्यात आले. संपूर्ण मानव जात हळहळली. आता शांत राहून चालणार नाही भारत अब सहेगा नहीं, जवाब देगा म्हणून अतिशय संयमाने व विचारपूर्वक निर्णय करून ७ मे रोजी हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि केवळ वीस मिनिटात अतिरेयांचे अड्डे बेचिराख केले. या सर्व घटनेचे पुरावे आम्ही दाखवले या उलट पाकिस्तानने भारताचे चार राफेल विमान पाडून भरपूर नुकसान केल्याच्या दावा केला मात्र कसल्याही प्रकारचे पुरावे ते सादर करू शकले नाही. अशी माहिती पुणे येथील एअर मार्शल प्रदीप बापट यांनी दिली.
ते ८ ऑटोबरला (वायुसेना दिवस) कारंजा येथील नानासाहेब दहिहांडेकर प्रांगणात सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेत बोलत होते. ऑपरेशन सिंदूर एक अभूतपूर्व पराक्रम हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी डॉ. अजय कांत व विनीत गोलेच्छा यांनी त्यांचे स्वागत केले तर आमदार सई डहाके यांचे स्वागत वर्षा दहिहांडेकर यांनी केले.
कॅ. अतुल एकघरे यांनी त्यांचा परिचय करून दिला. युद्धजन्य परिस्थितीत सैन्या बरोबर नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते हे सांगताना बापट पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले. अशा दिवसांमध्ये सोशल मीडियावरील काही पोस्ट ज्या देशाला हानी पोहोचू शकतील त्या फॉरवर्ड करू नये, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी नागरिकांना किंवा मिलिटरी स्थळावर अटॅक केलेल्या नाही. या ऑपरेशनमध्ये तिन्ही दलांचा उत्कृष्ठ समन्वय होता. कधी, कोठे, कोणते मिसाईल व लढाऊ विमान वापरावी याच्यासाठी योग्य ते निर्णय घेतल्या गेले. यावेळी बापट यांनी या ऑपरेशनमध्ये वापरण्यात आलेली विविध लढाऊ विमाने, मिसाईल्स व ड्रोन यांची संपुर्ण माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर मुळे फायदा असा झाला की,भारतीय बनावटीच्या मिसाईलला मागणी वाढत आहे. काही मिसाईल आपल्या शास्त्रज्ञांनी विदेशी किमतीच्या तुलनेने कमी किमतीत बनवून दाखवली, हा आत्मनिर्भर भारताचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे ऑपरेशन रोखल्या गेले ते थांबवले नाही. कोणतेही युद्ध हे हितकारक नसते त्यामुळे देश पिछाडीवर जातो आणि आपल्याला तर आर्थिक दृष्ट्या तिसर्या क्रमांकावर जायचे आहे. या ऑपरेशनमध्ये आपण पाकिस्तानला चांगला धडा शिकवला असल्याचे त्यांनी सांगितले.pradeep bapat यावेळी नुकतेच मिग २१ हे लढाऊ विमान हवाई दलातून निवृत्त झाल्याने येथील माजी सैनिक संघटनेने त्या विमानाला सलामी दिली. ऑपरेशन सिंदुरमध्ये शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना तसेच पहलगाम येथील क्रूर आतंकवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजा गोरे यांनी केले तर निशिकांत परळीकर यांनी शारदास्तवन म्हटले.