अathavi Puja in Vidarbha अश्विन महिन्यात साजरी होणारी कलाष्टमी, जी विदर्भात ‘आठवी पूजन’ म्हणून ओळखली जाते, ही परंपरा दिवाळीच्या आठ दिवस आधी खास महत्त्वाने साजरी केली जाते. यावर्षी, १३ ऑक्टोबरला घरोघरी केली जाणार आहे. आठवी पूजनाच्या माध्यमातून लोक आपल्या घरात आरोग्य, सुख-समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीची प्रार्थना करतात. विदर्भात ही पूजा घराघरांत पारंपरिक पद्धतीने केली जाते. घरातील मातीच्या मडक्यांमध्ये कणकेचे वेणी, सूर्य, चंद्र, तारे आणि फणी तयार करून ठेवले जातात. नंतर या मडक्यांचा विधिवत पूजन केला जातो.

बाजारातून आठवी मातेची प्रतिमा असलेला कागद, ज्वारीची धांद्याची झोपडी, बोर, आवळा, शिंगाडा आणि इतर फळांसह पूजनासाठी आणले जाते. पूजेनंतर घरातील सर्व सदस्य आठवी मातेकडे आपापल्या मनोकामना व्यक्त करतात आणि निरोगी जीवनासाठी प्रार्थना करतात. आठवी देवीला त्वचारोग दूर करण्याचे विशेष महत्त्व आहे. कांजण्या, गोवर, शिरणी अशा त्वचारोगांनी त्रस्त व्यक्ती देवीकडे क्षमा मागतात आणि आपली प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतात. तसेच घरातील कुठलाही रोगाचा प्रसार होऊ नये, तसेच घरात सुख-समृद्धी नांदावी, ही मनोकामना केली जाते.
आठवी पूजनाच्या दिवशी आंबिलीला विशेष महत्त्व दिले जाते. पाटावर कोरा कापड टाकून त्यावर आठवीची पूजा मांडली जाते, आणि ज्वारीची आंबील देवी जवळ ठेवली जाते. काही ठिकाणी गोड, तर काही ठिकाणी फोडणीची आंबील तयार करून नैवेद्य म्हणून देवीसाठी ठेवली जाते. पूजनानंतर ही आंबील काही घरी लगेचच खाल्ली जाते, तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना सेवन केली जाते. विदर्भातील आठवी पूजन परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नाही, तर ही आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी विश्वास आणि संस्कृतीचा सुंदर असा संगम आहे. घराघरांत ही परंपरा आजही नितांत श्रद्धा आणि भक्तीने साजरी केली जाते.