बीड,
Conversion in Beed Jail बीड जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे कैद्यांवर धर्मांतरणासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कारागृहात असलेल्या कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी हा आरोप केला असून, कैद्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन हिंदू आणि एक मुस्लीम कैद्यांवर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्म बदलण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धर्म परिवर्तनास नकार दिल्याने या कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचंही वकिलांनी सांगितले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पेट्रस गायकवाड यांच्याविरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
या घटनेनंतर बीड कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वीही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला मिळालेल्या विशेष वागणुकीमुळे बीड कारागृह चर्चेत होते. आता धर्मांतरणाचा आरोप झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. कैद्यांच्या वकिलांसह एका कैद्याच्या पत्नीनंही माध्यमांसमोर कारागृहातील आपबीती सांगितली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारागृह अधीक्षकांवर कठोर आरोप केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्याचा इशाराही दिला आहे. तर आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील या प्रकरणी कठोर चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.
अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे नाव याआधीही वादात आले होते. कैद्यांकडून स्वतःच्या गाड्या धुवून घेणे, कारागृह परिसरातील अवैध वृक्षतोड यांसारख्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या होत्या. आता धर्मांतरणाचा आरोप झाल्याने गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणी प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाणार, आणि अधीक्षकांविरुद्ध प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.