गोंदिया,
railway crossings closure दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळा अंतर्गत येणार्या गोंदिया जिल्ह्यातील चार मानवरहीत रेल्वे फाटक तात्पुरते बंद राहणार आहेत.
रेल्वेद्वारे ट्रॅक सुरक्षितता आणि सुरळीत परिचलनासाठी रेल्वेच्या नागपूर विभाग अंतर्गत निर्धारित ओव्हरहॉलिंग, डीप स्क्रीनिंग, पैकिंग कार्य प्रस्तावित आहे. यामुळे आमगाव-गुदमा विभागातील फाटक एलसी क्र. ४९८ ही १४ ते १७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहील. या कालावधीत फाटक एलसी क्र. ५०१ चिरचर फाटकावरून रस्ते वाहतूक वळवली जाईल. सालेकसा-धानोली (डाउन लाईन) वरील फाटक एलसी क्र. ५०१ ही १७ ते १९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बंद राहील. या फाटकावरील वाहतूक एलसी क्र. ४८६ हलबीटोला फाटकावरून वळवली जाईल. सालेकसा-धानोली (अप लाईन) अंतर्गत एलसी क्र. ४८८ ही फाटक २६ ते २८ ऑक्टोबरपर्यंत रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहील. या काळात रस्ते वाहतूक एलसी क्र. ४९१ दरबाडा फाटकावरून वळवली जाईल. तसेच सालेकसा-धानोली (अप लाईन) वरील एलसी क्र. ४८७ ही २ ते ४ नोव्हेंबरपर्यंत रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहील, या दरम्यान रस्ते वाहतूक एलसी क्र. ४८६ हलबीटोला फाटक मार्गे वळवली जाईल, असे रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे कळविण्यात आले आहे.