मुंबई,
shubman gill ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघाची घोषणा होताच एक मोठा धक्का क्रिकेटप्रेमींना बसला, जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार रोहित शर्माला संघाच्या नेतृत्वावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिलकडे वनडे संघाची धुरा सोपवण्यात आली असून, गिलने पहिल्यांदाच कर्णधारपदाबाबत माध्यमांशी संवाद साधला.
अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दरम्यान वनडे संघाच्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली. मात्र, गिलने उघडपणे सांगितले की त्याला याची कल्पना आधीच होती. "घोषणा कसोटी सामन्याच्या मधोमध झाली, पण मला आधीच सांगण्यात आले होते. ही एक मोठी जबाबदारी आणि सन्मान आहे. मी माझ्या देशाचे वनडे क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्यासाठी तयार आहे," असे गिलने सांगितले.या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे की रोहित शर्माची कर्णधारपदावरून सुटका हे अचानक घेतलेले निर्णय नव्हते, तर त्यावर आधीच विचारविनिमय झाला होता. असं मानलं जातंय की बीसीसीआयचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित अगरकर आणि गिल यांच्यात यापूर्वीच या विषयावर चर्चा झालेली होती.दरम्यान, रोहित शर्माच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांनी देखील रोहितच्या वनडे करिअरबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे रोहितचा पुढील वनडे कारकिर्द किती काळ टिकेल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
तथापि, शुभमन गिलने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, "वनडे संघासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांचीही गरज आहे." त्यामुळे जरी नेतृत्व बदलले असले तरी गिलच्या दृष्टीने हे दोघेही अजूनही संघासाठी महत्त्वाचे घटक आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही खेळताना दिसणार आहेत. मात्र, ही मालिका त्यांच्या वनडे कारकिर्दीतील अखेरची ठरेल का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.या निर्णयाने भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे, असे अनेक क्रिकेट तज्ज्ञ मानत आहेत. गिलला संधी देऊन बीसीसीआयने भविष्यातील नेतृत्वाचा पाया घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता गिल या जबाबदारीवर कितपत खरा उतरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.