अशी संकटे येती...

09 Oct 2025 18:33:48
अग्रलेख...
sawai mansingh hospital सातत्याने हाल सहन करावे लागले, संकटांचा सामना करण्याची वेळ वारंवार येऊ लागली, की ती जणू जीवनशैलीच होऊन जाते. सततच्या आघातांच्या वेदना आणि संवेदनाही बोथट होऊ लागतात आणि असे काही घडणे ही नियतीच आहे, असा विचार करून त्यास सामोरे जाण्याखेरीज पर्याय नाही, अशी नकारात्मक भावना तयार होऊ लागते. ज्या समाजात अशा भावनांचे घर तयार होते, तो समाज संकटांशी संघर्ष करण्याची उमेदच हरवून बसतो आणि त्याच्या या दुर्बळपणाचा फायदा घेण्यासाठी संकटे अधिकाधिक आक्रमक होत जातात. काही संकटांचा मुकाबला करणे खरोखरीच आवाक्याबाहेरचे काम असले, तरी आघात करण्याची संधीदेखील मिळू नये यासाठी जागरूक राहिल्यास संकटांनाही सावध राहावे लागते. कोणतेही संकट हे संधीची वाट पाहात सर्वत्र दबा धरून बसलेलेच असते, याची जाणीव ठेवली नाही, तर तशी संधी मिळताच ते अक्राळविक्राळ रूप घेऊनच आक्रमण करते, तेव्हा मात्र त्या क्षणी हतबलतेच्या जाणिवेने समाज गलितगात्र होतो हे खरे असले, तरी संकटांना अशी संधी पुन्हा मिळू नये यासाठी नव्या उपाययोजनांची कंबर कसणे हाच संकटांचे सातत्य टाळण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय असतो.
 
 

fire  
 
 
हा उपाय काही नवा नाही. तो सर्वांस ठाऊकही असतो. म्हणूनच जेव्हा एखादे संकट अनपेक्षितपणे कोसळते, तेव्हा काही पठडीबाज वाक्ये हमखास वापरली जातात. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जातात. जेव्हा जेव्हा अशी काही दुर्दैवी संकटे उद्भवली आणि त्यामध्ये निष्पापांच्या जिवावर बेतले, तेव्हा तेव्हा सरकारी यंत्रणांनी हेच केले. तुमचे दुःख हलके करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, तुम्ही स्वतःला सावरा, बाकीचे आम्ही पाहतो, हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शब्द तेव्हा कमालीचे लोकप्रिय झाले होते. केवळ संवेदनांची फुंकर मारण्यापलीकडे यामध्ये कसलाही ओलावा नाही, हे काळाने पुढे दाखवूनही दिले आणि समस्या, संकटे कोसळतच राहिली. अशा संकटांशी सामना करण्यासाठी आपणच आपल्या हातांना बळ दिले पाहिजे, हे मात्र समाजाला समजून चुकले. म्हणूनच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून करावयाच्या उपाययोजनांचे पुढे काय होते, याची फारशी फिकीर अलिकडे कोणी करत नसावेत. तसे नसते, तर वारंवार घडणाऱ्या त्याच घटनांचा किंवा सातत्याने कोसळणाऱ्या त्याच त्याच संकटांचा जाब विचारण्याऐवजी त्याची जेमतेम दखल घेण्याची मानसिकता बळावत चालली नसती. अशी संकटे म्हणजे जीवनशैलीचाच भाग असल्याची उदास भावना या मानसिकतेतून डोकावते. काही दिवसांपूर्वी राजस्थानात जयपूर येथे एका इस्पितळात लागलेल्या आगीत सहा नवजात बालके दगावल्याच्या घटनेची बातमी केवळ दखल घेण्यापुरतीच महत्त्वाची ठरली. गेल्या काही वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात अशाच दुर्घटना वारंवार घडल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्यामागील कारणेही उघड झाली आहेत. ती कारणे दूर केली तर त्या दुर्घटनांना संधी मिळणार नाही हे स्पष्ट असताना त्याकडे कानाडोळा का केला जात असावा, असा प्रश्न आजकाल फारसा विचारला जात नाही. कारण संकटे हा जीवनशैलीचाच एक भाग होऊन राहिला की असे प्रश्नदेखील सहसा त्यामध्ये अडथळे आणत नसावेत.
गेल्या रविवारी, 5 तारखेच्या रात्री, म्हणजे सोमवारची पहाट फुटण्याआधी, राजस्थानच्या जयपूर येथील सवाई मानसिंग इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. ज्या कक्षाचे नाव अतिदक्षता कक्ष आहे, तेथील दक्षतेच्या त्रुटी वारंवार उघडकीस येण्याच्या अन्य अनेक प्रकारांचीच ही पुनरावृत्ती म्हणावी लागेल.sawai mansingh hospital त्या आगीने सहा रुग्णांचा जीव घेतला. जिथे जगविले जाते या विश्वासाने रुग्ण दाखल होतात, तेथेच आसपास अशा संकटाचे सावट असावे आणि त्याला रोखण्याच्या सामान्य उपाययोजनांचाही अभाव असावा ही दुर्दैवी परिस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. या इस्पितळाच्या इमारतीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. बघता बघता तिने सहा जिवांचा घास घेतला. अशा वेळी मदतीच्या सर्व यंत्रणा सज्ज व्हावयास हव्यात, पण येथे उलटेच झाले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी असलेल्या साधनांचा अभाव तर होताच; पण जीव वाचविण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी स्वतःचाच जीव वाचविण्यासाठी लांब पळून गेल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. अशी भीषण दुर्घटना घडल्यानंतर सर्वत्र जे होते, तेच येथेही घडले. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांचे ताफे आणि सरकारी अधिकाèयांनी सांत्वन यात्रा काढल्या, मृतांच्या नातेवाईकांना दिलासा दिला, मृतांविषयी सहानुभूती व्यक्त केली, चौकशीचे आदेश दिले, दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले गेले आणि अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या गेल्या.
जगण्याच्या आशेने विश्वासाने जेथे पाऊल टाकावे, तेथेच मृत्यू वाट पाहात ताटकळत बसलेला असावा ही मोठी दुर्दैवी बाब आहे. इस्पितळांतील आगी ही गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक सर्वसामान्य घटना होऊन राहिली आहे. अशा ठिकाणी उपचार घेणारे जीव बहुतांशी प्रकृतीच्या कारणांमुळे संरक्षणासाठी अन्य व्यवस्थांवरच अवलंबून असतात. या विश्वासाचाच अभाव जेथे असतो, तेथे या संकटाचे सावट सतत असावे, हेच अशा अनेक घटनांतून दिसून आले आहे. विशेषतः ज्यांना आपल्या डोळ्यांनी जग पाहण्याची संधीदेखील मिळालेली नाही, ज्यांच्या श्वासाची जेमतेम आवर्तने पूर्ण करून नव्या दिवसाच्या जाणिवा विकसित होण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे अशा नवजात जिवांवरच या संकटांचा डोळा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या ठाणे महानगरात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज इस्पितळात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या महिनाभरात एकाच महिन्यात 21 नवजात बालके दगावल्याचेही उघडकीस आले होते. जानेवारी 2021 मध्ये महाराष्ट्राच्याच भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या उपचारासाठी असलेल्या अतिदक्षता कक्षात शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली आणि 10 नवजात बालकांना उघड्या डोळ्यांना नवे जग पाहण्याची संधीही न देता मृत्यूने त्यांचा घास घेतला. या घटनेने अवघे राज्य सुन्न झाले. राज्य सरकारने या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले, अग्निसुरक्षा यंत्रणेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे फतवे जारी झाले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी आश्वासने देऊन सरकारी यंत्रणा पुन्हा आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाल्या. अनेक रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणांची वर्षानुवर्षे तपासणीच होत नसल्याचे याआधीच्या अनेक चौकशांमधून उघड झाले आहे. कळवा रुग्णालयाकडून तर त्यावेळी अग्निसुरक्षा यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारकडून सुमारे दीड कोटींच्या निधीची मागणीही करण्यात आली होती, पण त्यावर मंजुरीची मोहोर उमटलीच नाही आणि अग्निसुरक्षा यंत्रणेतील त्रुटींच्या मागे दडून बसलेल्या संकटाने संधी साधली. त्यापाठोपाठ तीन महिन्यांत एप्रिल 2021 मध्ये मुंबईजवळ विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीतही काही रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि त्रुटींची चौकशी करण्याचे सरकारी आदेश जारी झाले. गेल्या वर्षी 26 मे 2024 रोजी दिल्लीच्या विवेक विहार नावाच्या खाजगी इस्पितळात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. सुमारे सहा महिन्यांपूर्वी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात याच त्रुटीआड दडून बसलेल्या संकटाने आगीच्या रूपाने नवजात बालकांवरच हल्ला केला; तेथील कर्मचाèयांनी जिवाची बाजी लावून संकट परतवून लावल्याने 76 नवजात बालकांचा जीव वाचला. याच इस्पितळात चार वर्षांपूर्वी अशीच दुर्घटना घडली होती, तेव्हाही कर्मचाèयांनी हिमतीने नवजात बालकांना वाचविले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना तेव्हाही दिल्या गेल्या होत्या. चार वर्षांतच त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली, तेव्हा खबरदारीच्या सूचनांचे काय झाले हा प्रश्न अनेकांच्या मनात निश्चितच डोकावला असेल.
अशा दुर्घटनांनंतर एक बाब सातत्याने स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे, देशातील अनेक इस्पितळांमधील अग्निसुरक्षा यंत्रणांची वर्षानुवर्षे तपासणीच झालेली नसल्याने त्यांची क्षमता तर संशयास्पद राहिलीच; पण संकटकाळात त्या यंत्रणा कार्यान्वित होतात किंवा नाही हेदेखील शंकास्पद राहिले. संकटे ही जीवनशैलीच झाल्याची भावना बळावत जाते. अशा भावनेने हतबल झालेल्या समाजाची संकटांशी संघर्ष करण्याची उमेद हरवत जाते. इस्पितळांतील आगीच्या दुर्घटना टाळण्याबाबत यंत्रणा उदासीन का असतात, हे मात्र अजूनही एक कोडे होऊन राहिलेले आहे. जयपूरच्या ताज्या घटनेने त्या उदासीनतेलाच उजाळा मिळाला आहे.
Powered By Sangraha 9.0