गोंदिया,
Gondia Police जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा व सुविधा तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव यादृष्टीने मदत, उपाययोजना व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे ९ ऑक्टोबर रोजी ‘व्हॉट्सअॅप एआय चाट बीओटी’ ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना विशेषतः महिलांना संकट काळात पोलिसांना तत्काळ तक्रार करता यावी, पोलिस विभागाची तत्काळ मदत व मार्गदर्शन मिळावे, संभाव्य संकटावर मात करता यावी आदी उद्देशाने जिल्हा पोलिस विभागाने ‘व्हॉट्सअॅप एआय चाट बीओटी’ प्रणाली जिल्ह्यात कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी ९१७४४७७३३१०० या मोबाईल क्रमांकाशी आपल्या व्हॉट्सअॅपद्वारे जोडून व्हॉट्सअॅपवर ‘हाय’चा मॅसेज करून प्रणालीद्वारे दिल्या जाणार्या विविध सुविधा निवडता येईल. महिला सुरक्षा व महिलासंबंधी तक्रार करण्यासाठी ‘व्हुमेन सेफ्टी’चा पर्याय दिले आहे. सायबर गुन्ह्याचा बळी ठरलास ‘सायबर फ्रॉड रिपोर्टिंग’चा पर्याय आहे. तसेच कोणत्याही प्रकारची पोलिसांना तक्रार करायची असल्यास ‘ऑनलाईन कंम्प्लेट’ हा पर्याय वापरता येते. वस्तू हरवलेली असल्यास ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या पर्यायाचा वापर करून पोलिसांना ऑनलाईन माहिती देणे शक्य होणार आहे. नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूची माहिती पोलिसांना द्यायची असल्यास ‘टेनंट इर्न्फामेशन’ चा पर्याय आहे. तसेच सायबर सुरक्षा व जनजागृतीसाठी माहिती व त्या संबंधाने काही माहिती व जनजागृतीचे चलचित्रे ‘सायबर अव्हेरनेस’ या पर्यावर पाहता येतील. यासोबतच महिला सुरक्षा किंवा सायबर सुरक्षेसंदर्भात या प्रणालीवर प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तरही मिळणार आहे. विशेष म्हणजे, महिलांना तत्काळ मदत हवी असल्यास ‘व्हुमेन सेफ्टी’ पर्यायातील ‘टॉक टू सायबर दीदी’ पर्यायाच्या माध्यमातून महिलांना महिला पोलिस कर्मचार्यांशी बोलता येते. तर महिला धोक्यात असल्यास ‘एसओएस’ पर्यायाच्या माध्यमातून त्यांचे ‘लाईव्ह लोकेशन’ पोलिसांना पाठविता येते. लाईव्ह लोकेशन मिळताच भरारी व दामिनी पथकाद्वारे महिलांना तत्काळ मदत पुरविली जाणार आहे.
‘व्हॉट्सअॅप एआय चाट बीओटी’ प्रणालीमध्ये जुळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस हद्दीतील शाळा, महाविद्यालयाच्या दर्शनी भागात प्रणालीच्या क्यू. आर. कोडचे स्टिकर लावण्यात आले आहेत. हा क्यू. आर. कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून किंवा ९१७४४७७३३१०० हा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करून या प्रणालीचा लाभ घेता येते. प्रणालीतील सर्व पर्यायांची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा.
- गोरख भामरे
जिल्हा पोलिस अधीक्षक